मुसळधार पावसाच्या गजरात राज्यात आज बाप्पाचे वसर्जन झाले आहे. आज मराठवाडा, दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील 24 तासात बंगालचा उपसागर आणि म्यानमार च्या किनाऱ्याजवळील उत्तर अंदमान समुद्रात वादळी वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वायव्य दिशेने जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात आज पावसाचा जोर कायम राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर राहणार असून पूर्व अरबी समुद्र तसेच किनारपट्टी लगतच्या भागात 65 किलोमीटर प्रतितास वेग राहू शकतो. त्यामुळे मच्छीमारांना संबंधित कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यात आज हलक्या ते मध्यम सरींची हजेरी असेल. कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे ते पाहूया...
पावसाचा यलो अलर्ट कुठे?
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड तसेच अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्हा ना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.