गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी वरूणराजाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली. लातूर, बुलढाणा, अकोला, वर्धा, परभणी, अमरावती व इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यात पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवेची चक्रीय स्थिती सध्या महाराष्ट्राच्या मध्य भागावर आहे. कोकण, गोव्यात पाच दिवस हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात नगर, सांगली व सोलापूर येथे ११ व १२ एप्रिल रोजी आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाटही होईल. विदर्भात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होईल. राज्याच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवस काही बदल होणार नाही. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ ३५ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदले गेले.
मराठवाड्यात फटका
मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही वादळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी पावसामुळे अनेक भागात पिके आडवी झाली. बीडमध्ये वीज पडून एक गाय दगावली.
अमरावतीला झोडपले
पश्चिम वन्हाडात मंगळवारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे गहू, उन्हाळी ज्वारी, हरभरा, केळी, आंबा लिंबू व इतर फळबाग पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात केळीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.
अकोला जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली, वाशिम जिल्ह्यातील धोडप (ता. रिसोड) येथे गाराचा पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. रस्त्यांवर आणि शेतशिवारातही गारांचा थर साचला होता. मालेगाव, मंगरुळपीर तालुक्यांनाही अवकाळीसह गारपीटीचा फटका बसला.
जळगावमध्ये नुकसान
जामनेर आणि बोदवड तालुक्यात वादळामुळे घरांचे नुकसान झाले. अनेक भागात दुपारीच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मका, केळी व ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. तळेगाव, तोंडापूर व पहूर परिसरातही पावसाने हजेरी लावली.
अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार, वरूड, मोर्शी तालुक्यात गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे काही भागांत पाऊस झाला. संत्र्यासह काढणीला आलेला गहू व फळे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.