Join us

नांदेडला गारपीटीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 9:17 AM

एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू; वादळी वारे, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान : बळीराजा हवालदिल

नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, सोसाट्याचे वारे आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी हंगामावर होती. मात्र, रब्बी हंगामातदेखील अतिवृष्टी, गारपीट होत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. १६ मार्चला पिकांचे कंधार तालुक्यातील कौठा, बारुळ, नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी, मांजरम, देगाव, भोकर, आदी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तसेच नायगाव येथे गारपीट झाली.

येलूर येथे वीज पडून युवक दगावला, घरही कोसळले

नांदेड जिल्ह्यात अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. त्यात कंधार तालुक्यातील येलूर येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून सिरसी येथे एक बैल दगावला आहे. जिल्ह्यात शनिवारी अनेक भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. देगलूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. हिमायतनगर तालुक्यातही अनेक गावांत गारपीट झाली आहे.

याशिवाय कंधार, नायगाव, भोकर तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली आहे. कंधार तालुक्यातील येलूर येथे बालाजी व्यंकटराव शिंदे (२२) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडली. तसेच सिरसी बु. येथे बालाजी ग्यानोबा कैलासे यांचा बैल दगावला आहे. तर शिरुर येथे शिवाजी जाधव यांचे घर वादळी वाऱ्यात कोसळले. किनवट शहर आणि परिसरातही गारपिटीची नोंद झाली आहे. या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले.

टॅग्स :गारपीटनांदेडपाऊसशेतकरी