अझहर अली
सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
११ दिवसांपूर्वी २३ जुलै रोजी या धरणात २५.८१ टक्के जलसाठा असल्याने चिंता वाढली होती. मात्र, आता पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक वाढत असून, शनिवारी धरणात ४३.०८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी ३ ऑगस्ट २०२३ रोजी हनुमान सागर धरणात ६१.६५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणाच्या जलाशय पातळीत १८.५७ टक्क्यांनी घट झाली आहे.
शनिवारी हनुमान सागर धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ३९८.२३ असून, धरणात ४३.०८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. हनुमान सागर धरणात गेल्या अकरा दिवसांत १७.२७ टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली आहे.
जलसाठा टक्क्यांमध्ये
२३ जुलै रोजीचा - २५.८९%
वाढ झालेला जलसाठा - ४३.०८%
३ ऑगस्ट रोजी उपलब्ध - ६१.६५%
१४० गावांना भुमीगत जलवाहिनीद्वारे होते पाणीपुरवठा
धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. दरम्यान, पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याच्यावर कालावधी उलटूनसुद्धा धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. आठवडाभरापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे.
अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातून अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यांसह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपाणपट्ट्यातील संग्रामपूर व जळगाव जा. तालुक्यातील १४० गावांना भूमीगत जलवाहिनीच्या माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.
वान नदीपात्रावरील या हनुमान सागर धरणावर शेकडो गावांतील लाखो नागरिकांची तहान अवलंबून आहे. तसेच येथे वीज निर्मिती संच कार्यान्वित असून, त्या संचाची क्षमता १ हजार ५०० मेगावॅट आहे. दरवर्षी १ मेगावॅट वीज निर्मिती येथे करण्यात येते. मात्र सध्या वीज निर्मिती संच बंद आहे.
मध्य प्रदेशात उगम असलेली वान नदी सातपुडा पर्वतरांगेतून वाहते. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पाऊस पडल्यास या धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होते. समाधानकारक पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत असून, जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे.