देशाच्या अनेक भागांना रविवारी उष्णतेच्या तीव्र लाटेला सामोरे जावे लागले. दरम्यान हवमान विभागाने महाराष्ट्रात विदर्भाला उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, तापमानाचा पारा वाढला असून ४२ ते ४५ अंशांच्या दरम्यान नाेंद होत आहे.
देशभरात विविध भागांत कमाल तापमान सामान्यपेक्षा चार ते सहा अंश सेल्सिअस अधिक नोंदवले गेले. ओडिशा, रायलसीमा, पश्चिम बंगाल (गंगेच्या खोऱ्याचा भाग), झारखंड, विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे काही भाग तर अक्षरशः होरपळून निघाले. तेथील कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान होते. त्याचबरोबर बिहार, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी व उत्तर प्रदेशच्या काही भागांत पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहिला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट ही या महिन्यातील दुसरी लाट आहे. पहिल्या लाटेत ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल (गंगेच्या खोऱ्याचा भागा तेलंगणा आंध प्रदेश तामिळनाडू आणि गुजरातचे काही भाग होरपळले होते. जेव्हा मैदानी भागातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर, किनारपट्टी भागात ३७ अंश व डोंगराळ भागात ३० अंश सेल्सिअसवर नोंदवले जाते आणि पान्ऱ्यातील फरक सामान्य पातळीहून ४.५ अंश सेल्सिअसने अधिक असतो तेव्हा ती उष्णतेची लाट ठरते. परंतु, कमाल तापमान सामान्य पातळीहून ६.४ अंश सेल्सिअसने अधिक असल्यास गंभीर उष्णतेची लाट घोषित करण्यात येते.
अल-निनोची कमकुवत परिस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने एप्रिल आणि जूनदरम्यान उष्णतेची तीव्र लाट येईल, असा इशारा आधीच दिला होता. एप्रिल-मे दरम्यान सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक होत असून, एक अब्ज नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उष्णतेच्या लाटेचा त्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
कुठे किती तापमान ?
रविवारी झारखंडमधील बहरगोरा येथे सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यापाठोपाठ ओडिशातील बारीपाडा येथे ४४.६ अंश आणि पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे ४४ अंश सेल्सिअस, तर विदर्भातील वाशीम येथे ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.