राज्यात उन्हाचे चटके वाढले असून आज ८ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. सुर्य डोक्यावर येण्याआधीच उष्णता वाढत असून नागरिकांना घामाच्या धारांसह अंगाची लाही लाही होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानाच्या उच्चांकाची नोंद होत असून सुर्य आग ओकत आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमान ४३ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उष्णतेच्या लाटांचा इशाराही या भागात देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीच्या भागात आज उष्ण व आर्द्र हवामानाची नोंद होत असून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, पुणे, नगर, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात मागील १५ दिवसांपासून तापमानाचा उच्चांक पहायला मिळत असून तापमान ४२ ते ४५ अंशांच्या दरम्यान जात आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, उर्वरित राज्यातही तापमानाचा पारा ४० पार गेला असून उष्णता असह्य होत आहे. हवमान विभागाने नोंदवलेल्या तापमानानुसार पुढील तीन दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. अवकाळी पावसाची शक्यता नसून बहुतांश भागात कोरडे हवामान राहणार आहे. किनारपट्टीच्या काही भागात आर्द्रता असून उष्ण हवामान राहणार आहे.