उत्तरेकडून उष्ण वारे येत असल्यामुळे राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि परभणीने तापमानाची चाळीशी ओलांडली आहे.
अकोला येथे ४४.१ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता असून, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
एप्रिल सुरू होताच राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटदेखील झाली होती. मात्र, आता पुन्हा सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे.
उत्तरेकडून उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरणाची शक्यता आहे.
मुंबईचा पारा घसरला, काहिली कायम
अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईचा पारा बऱ्यापैकी घसरला असून, तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मात्र, आर्द्रता अधिक असल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. पुढील आठवडाही कमी तापमानाचा मात्र अधिक आर्द्रतेचा असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची काहिली होणार आहे.
राज्यातील कमाल तापमान पुढीलप्रमाणे
पुणे - ४०.३
जळगाव - ४२.२
सातारा - ४०.७
सोलापूर - ४२.८
नाशिक - ४०.२
औरंगाबाद - ४२.४
परभणी - ४२.१
अमरावती - ४२.६
चंद्रपूर - ४३
नागपूर - ४१.१
वर्धा - ४१.५
यवतमाळ - ४३.४
अधिक वाचा: शेतात गाळ भरताय? कोणत्या प्रकारचा गाळ भरणे योग्य? जाणून घ्या सविस्तर