पुणे : कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याने हवामान विभागाने येथे यलो अलर्ट दिला आहे. पुण्यातही तापमान चाळिशीपार गेला आहे. कोरेगाव पार्क, वडगावशेरी, पुरंदर, इंदापूर येथे ४०अंशांच्या वर पारा गेला.
राज्यातील कोकणात दमट व उष्ण हवामान राहणार आहे, तर धुळे, नंदूरबार, लातूर, वर्धा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, जळगाव, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात ४८ तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट दिला आहे. पुणे व परिसरात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाळी वातावरण तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
विदर्भ चांगलाच तापत आहे, तिथले कमाल तापमान चाळीशी पार गेलेले आहे. कोरेगाव पार्क येथे ४०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर वडगावशेरी ४०.४, पुरंदर ४०.१, इंदापूरला ४०.१ तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगरला ३९.१ तापमान होते.