राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. नागरिकांना उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळाला असला तरी मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात उष्ण व आर्द्र हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
हवमान विभागाने दिलेल्या विशेष बुलेटीननुसार, किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला असून पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी 'x' समाजमाध्यमावर हा अंदाज व्यक्त केला आहे.
दोन दिवसांपासून उत्तर व दक्षिण कोकणात ३२ ते ३८ अंश तापमानाची नोंद होत असून मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले.
कोकण किनारपट्टीवर पुडील २४ तासात तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून २४ ते २८ एप्रिल दरम्यान उष्ण व आर्द्र हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने नोंदवली.