Heatwave alert : नवीन वर्षात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कुठे ढगाळ हवामान, तर कुठे उन्हाच्या झळा पाहायला मिळत आहे. आज हवामान विभागाने राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा (Heatwave alert) चांगलाच जाणवणार आहे. तर, कोकण आणि नजीकच्या भागामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती असून, इथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातही उकाडा वाढत असून, सूर्य डोक्यावर आल्यानंतर आता अनेक ठिकाणी घराबाहेर पडणे कठीण होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र मात्र अद्यापही पहाटेच्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये गारठा जाणवत आहे. काही दिवसांनंतर मात्र येथेही कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना दिसेल.
डॉ. के. एस. होसाळीकर (माजी प्रमुख, IMD पुणे) (Dr. K. S. Hosalikar) यांच्या माहितीनुसार, २५ आणि २६ फेब्रुवारी या दोन दिवशी राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heatwave alert) जारी करण्यात आला आहे.
प्रामुख्याने २५ फेब्रुवारी रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी तर २६ फेब्रुवारी रोजी पालघर इथे उष्मा वाढणार असून, उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
एप्रिल आणि मे महिन्यास अवधी असतानाच महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान येथे फेब्रुवारीपासूनच कमाल तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत असून, महाराष्ट्रातून हिवाळा तर गायब झाला असून तेथे उन्हाळ्यास सुरुवात झाली आहे.
फेब्रुवारीतच तापमान्यातच पारा ३८ अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे यंदाचा मे महिना आणखी किती तापदायक का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहील, असा इशारा देण्यात आला असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा.
* उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे.
* पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयुक्त, खनिजमिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे.
*पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.