Join us

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 27, 2023 6:30 PM

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होता असून धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरण 100% भरल्यानंतर आता ...

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होता असून धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरण 100% भरल्यानंतर आता पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून सातत्याने विसर्ग वाढवण्यात किंवा कमी करण्यात येणार आहे. दरम्यान नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

भंडारदरा धरणातून सातत्याने विसर्ग वाढविण्यात किंवा कमी करण्यात येणार असून त्या अनुषंगाने निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात प्रवरा नदीमध्ये विसर्ग वाढविला जाऊ शकतो. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाकडे पाण्याची आवक येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातून देण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वी भंडारदरा धरण १०० टक्क्यांनी भरल्याने धरणातून ८२० क्युसेकने विसर्ग सुरू होता. दोन दिवस नगर व धरण परिसरात झालेल्या चांगल्या पावसाने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज ६५५८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ओझर बंधाऱ्याच्या खालील बाजूस देखील विसर्ग करण्यात आला असून २१८ क्युसेकने तो होत आहे. निळवंडे धरण ८४.३० टक्के भरले असून आज ५४८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ७६७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भंडारदरा धरणातून करण्यात आला. तर निळवंडे धरणातून ७८०० क्युसेक चा विसर्ग करण्यात आला असून लवकरच हे पाणी जायकवाडी धरणात येणार असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अंशतः का असेना दिलासा मिळणार आहे.  ओझर वैर मधून २३४७ तर कोतूळमधून ३४१६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

 

टॅग्स :धरणजायकवाडी धरणपाणीअहमदनगरशेतकरी