Join us

Dam Water: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम; हे मोठे धरण ५० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:18 AM

चांदोली Chandoli Dharan परिसरात पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे, या पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

वारणावती : चांदोली परिसरात पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे, या पावसाने वारणा नदीच्यापाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दोन आठवड्यापासून पाऊस मुसळधार बरसत आहे, मात्र दोन दिवस झाले पावसाने पूर्ण पणे उघडीप दिली आहे मात्र पुन्हा पावसाला चांगली सुरुवात होईल अशी आशा आहे.

जुलै महिन्यात शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार कायम आहे बुधवारी सकाळी सात वाजता धरण ४९.६४ टक्के भरल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत पाणलोट क्षेत्रात ९५४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. २४ तासात १ मीटरने धरणाची पाणी पातळी वाढत आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात ७९३० क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे.

चांदोली धरण यावर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ५० टक्के भरले आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात आजपर्यंत १७.०८ टीएमसी पाणी साठा झाला असून धरणाची पाणी पातळी ६०६.२५ मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणातून ६७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाच टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली. चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाते त्यामुळे वारणा धरण पूर्ण भरण्याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे निर्धारित क्षमतेपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतरच वारणा नदीमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो.

धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दमदार हजेरी लावल्याने पावसाची संततधार कायम आहे त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली असून, परिसरातील ओढे, नाले तसेच वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे.

टॅग्स :धरणपाणीशिराळाशेतकरीपाऊसनदी