Join us

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार, असा असेल पुढील पावसाचा अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 17, 2023 3:41 PM

मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.  पूर्व विदर्भ आणि खानदेशातही मुसळधार ...

मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.  पूर्व विदर्भ आणि खानदेशातही मुसळधार पाऊस झाला असून धरणातील विसर्ग वाढला आहे. परिणामी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला.

बंगालच्या उपसागरात तयार झालेला मान्सूनचा आस दक्षिणेकडे सरकत असून २० तारखेपर्यंत तो अरबी समुद्राच्या दिशेने जात आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे. आज राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होणार असून नाशिक व नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबई व कोकणपट्ट्यात आज पावसाचा जोर वाढणार असून उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भापासून सुरू झालेल्या पावसाचा जोर हळूहळू दक्षिण दिशेकडे सरकत असून मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

18 ते 20 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कमी होतानाचे चित्र दिसत असून पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम सरींचाच पाऊस राज्यात असेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान आज महाराष्ट्रातील बहुतांश भाग मध्यम ते तीव्र ढगांनी झाकलेला असेल. पुढील तीन ते चार तासात या भागात अधून मधून जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आज नंदुरबार धुळे नाशिक पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाचे के.एस होसाळीकर यांनी सांगितले आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1703246541031616653

आज कुठे होणार पाऊस?

आज नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुणे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज