नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण काहीसे ढगाळ आणि धुकेयुक्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
आज सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर सुरगाणा तालुक्यातील काही भागात देखील पावसाने हजेरी लावली. दिंडोरीच्या पश्चिम भागात आज सांयकाळी पावसाची दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा मोठे संकट उभे राहिले आहे.
तालुक्यातील ननाशी परिसरात अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ननाशी परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे. रब्बी पिकांना थोड्याफार प्रमाणात या पावसाचा फायदा होईल, मात्र भात नागली, वरई, उडीद ही पिके सोंगून मळणीसाठी रचून ठेवली होती, त्यात पाणी गेल्याने या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रचून ठेवलेले धान्य काळे पडण्याची भीती आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे.
मागील अवकाळीने नुकसान केलेच परंतु, आता धान्य तयार झाल्यानंतर झालेले नुकसान यापेक्षा मोठे आहे. मागील अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही व आता पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
द्राक्ष बागायतदारांमध्ये भीती
एकीकडे या परिसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. सद्यस्थितीत द्राक्ष घडांना कव्हर लावण्याचे काम सुरू आहे. घड ऐन भरात असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान होण्याची भीती आहे. मागील अवकाळी पावसाचा नुकसानीतून शेतकरी उभा राहत असताना झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.