Join us

राज्यात आज मुसळधार, कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? वाचा...

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 15, 2023 6:54 PM

पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.बंगालच्या ...

पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला असून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मध्यप्रदेशाच्या उत्तर व मध्य भागात तसेच विदर्भातून मराठवाडा व उत्तर- मध्य महाराष्ट्रात ढग जमा होत आहेत. 

अमरावती जिल्ह्यात 'रेड अलर्ट'

विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोरदार इशारा हवामान विभागाने दिला असून आज अमरावती जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह तीव्र पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 64.5 ते 115.5 एम.एम प्रतितास राहणार आहे.

ऑरेंज अलर्ट कुठे?

आज राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना, वर्धा, नागपूर, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे.

पावसाचा 'यलो अलर्ट' या जिल्ह्यांना

राज्यात आज बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

 मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, यवतमाळ, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, अकोला

पुढील दोन दिवस पावसाचा असा असेल अंदाज

राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असून उद्या कोकण व मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकत असून पावसाचा जोर विदर्भ  मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण असा अरबी समुद्राच्या दिशेने जात आहे. उद्या विदर्भासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा असून सतरा व अठरा सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत असलेले हे कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा आणि छत्तीसगडकडे येण्याचे संकेत आहेत.

दरम्यान, आज नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. ओढे-नाले ओसंडून वाहत होते.  जिल्ह्यातील पिंपळगाव धानोरा गावात दुपारी चार वाजता मुसळधार पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी साठले होते. 

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्रमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजहवामान