Join us

राज्यात आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 07, 2023 12:28 PM

राज्यात आज पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात ...

राज्यात आज पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

उत्तर व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये व दक्षिणेकडील घाट भागात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 40-45 किमी प्रतितास वेगाने राहणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. नैऋत्य आणि पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्याची संभावना असून वाऱ्याचा वेग 45 ते 55 किलोमीटर ताशी ते 65 किलोमीटर प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोमालिया किनाऱ्याजवळ आणि मन्नारच्या आखातात मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आज राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने कोकण,मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

'या' जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट

आज मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, तर विदर्भात अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांना हलक्या व मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, काल राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काल मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि परिसरात पावसाला सुरूवात झाली. शेजारच्या दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड तालुक्यातही पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, कोराटे, जानोरी परिसरात काल श्रीकृष्ण जन्माच्या उत्सवानंतर लगेचच पावसाने हजेरी लावल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी दिली. रात्री १२ नंतर आलेला पाऊस सुमारे दोन तास पडत होता. दरम्यान नाशिक शहरात आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला असून वैजापूर, कन्नड, सोयगाव, फुलंब्री, गंगापूर, पैठण तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. शहरात आज सकाळपासून पावसाची भुरभुर सुरू आहे.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजमोसमी पाऊसपाऊसमहाराष्ट्रहवामानवनविभागविदर्भपुणेमराठवाडानाशिक