Join us

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 27, 2023 11:31 AM

राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धारण पाणलोटातही संततधार सुरूच असून नागरिकांची आज रत्नागिरीसह मुंबई,  पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पश्चिम आणि वायव्य बंगालच्या उपसागरावर उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत  कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 

 कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि मराठवाड्यात २६ ते २९ जुलै २०२३ रोजी विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज उर्वरित कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार  पावसाची शक्यता आहे.  

मध्य महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम असून, कोकणचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तुरळक भागात अतिवृष्टीची शक्यता ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे  आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजमोसमी पाऊसपाऊसहवामानमराठवाडामहाराष्ट्रशेतकरी