Join us

पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 08, 2023 1:50 PM

या जिल्ह्यांना यलो अलर्ट...

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहणार असून कोकण व राज्याच्या दक्षिण भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढत असून समुद्राच्या वायव्य व पूर्वमध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण,गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मान्सूनने निरोप घेतला असून राज्यात तापमानाचा पारा घसरतानाचे चित्र होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात खरीप काढण्यांना वेग आला असून रब्बीच्या पेरण्यांसाठी पूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. काही रब्बी पिकांसाठी  हा पाऊस पोषक असला तरी दिवाळीच्या तोंडावर झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्याच्या दक्षिण भागातच पावसाची शक्यता वर्तवली आली आहे. उर्वरित राज्यात हवामान काहीसे ढगाळ राहण्याची शक्यता असून मराठवाड्यात तापमानात घट होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्रांनी वर्तवला आहे.

आज कुठे होणार पाऊस?

आज कोकणातील रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रायगड , पूणे जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, आज सकाळपासून सांगली जिल्ह्यासह आष्टा, विटा गावांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. तसेच पुण्यात दुपारी १२ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली असून सोलापूरमध्येही पहाटेपासून पाऊस होता.कोकणातही काल रात्रीपासून पाऊस सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. 

 

 

भातशेती गेली पाण्यात

कोकणात मुसळधार पावसामुळे बांदा येथील भातशेती पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी दुपारपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने कोकणात काढणीला आलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले. 

सध्या भातकापणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी पाणथळ भागातील भात कापून सुक्या जागी वाळत टाकला होता. अनेकांची काढणीची लगबग सुरू असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. परिणामी, कापलेले भात पीक पाण्यावर तरंगू लागल्याने शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात गेली.

कोरडवाहू पिकांना दिलासा

कोरडवाहू पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक राहणार आहे. यंदा खरीप पेरण्या उशीरा झाल्याने हा पाऊस कोरडवाहू पिकांना फायदेशीर राहणार असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले.

टॅग्स :पाऊसहवामानशेतकरीवनविभाग