पुणे : राज्यातील विविध ठिकाणी पडलेल्या पावसाने कहर केला असून अनेक शेतकऱ्यांचे या पावसामध्ये नुकसान झाले आहे. येणाऱ्या काही दिवसांतच मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होणार असून पावसाच्या आधीच बिगरमोसमी किंवा पूर्वहंगामी पावसाने राज्याच हाहाकार माजवला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची खरिपाची तयारी सुरू आहे. पण एकीकडे उन्हाचा वाढलेला पारा आणि दुसरीकडे वादळी वाऱ्यासह आणि विजेंच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांचे आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
झाडे पडली उन्मळून
या पावसामध्ये वादळी वारा असून या तीव्रतेमुळे झाडे मुळापासून उन्मळून पडले आहेत. झाडाखाली दबून गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चारा पिके आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध असल्याने खरीप पिकांची लागवड केली आहे अशा पिकांनाही फटका बसला आहे.
नर्सरी पॉलीहाऊस आणि ग्रीनहाऊस भुईसपाट
वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे पॉलीहाऊसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोलापूर जिल्ह्यातील पॉलीहाऊस भुईसपाट झाले आहेत. त्याचबरोबर कुक्कुटपालनाच्या शेडचेही नुकसान झाले आहे. ज्या शेडमध्ये पक्षी (कोंबड्या) होते अशा शेडमधील कोंबड्या मोठ्या प्रमाणावर मृत पावल्या आहेत.
घरावरील पत्रे गेली उडून
वाऱ्यामुळे घरावरील पत्रेही उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या सर्व घटनांचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.