राज्यात अवकाळी पावसाचं सत्र काही थांबण्याची चिन्हे दिसत नसून आता हवामान विभागाने पुन्हा विदर्भाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स असून उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होत आहे. परिणामी विदर्भात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांनी म्हणजेच १६ व १९ मार्च तारखेपर्यंत विदर्भासह खान्देशात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहतील. वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
कुठे कुठे यलो अलर्ट?
विदर्भासह खान्देशात अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे. अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
तापमान वाढतेय
एका बाजूला राज्यात कडक उन्हाळा सुरु झाला असून तापमान वाढ होत आहे. तापमानात एक ते दोन अंशांची वाढ झाली असून मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तापमान चाळीशीपुढे पोहोचले आहे. दरम्यान, उत्तरेतील हवामान बदलांचा विदर्भ व खान्देशात प्रभाव दिसून येत असून तिथे वादळी पावसाची शक्यता दिसून येत आहे.