Join us

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अतिवृष्टी पंचगंगेची पातळी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 12:47 PM

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात धुवाधार पाऊस असून धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात धुवाधार पाऊस असून धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे.

'राधानगरी'तून प्रति सेकंद १ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १८ फुटाच्या वर गेली असून सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस होत आहे. विशेष म्हणजे रात्री पाऊस जोर धरतो. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड, चंदगड तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी पाऊस कमी असला तरी या पाच तालुक्यात जास्त आहे.

राधानगरी', 'दूधगंगा', 'पाटगाव', 'घटप्रभा', 'जंगमहट्टी', 'जांबरे', 'सर्फनाला' 'कोदे' या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पाऊस पाटगाव धरण क्षेत्रात तब्बल १३२ मिलीमीटर झाला.

धरण क्षेत्रात पाऊस असल्याने राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रति सेकंद ११०० घनफूट विसर्ग सुरू आहे. भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून 'कुंभी', 'कासारी', 'तुळशी'चे पाणी वाढले आहे.

कडवी नदीच्या पाणीपातळीत वाढ• दोन दिवसांतील जोरदार पावसाने कडवी नदी ओसंडून वाहू लागली आहे. ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. भात रोप लावणीला गती मिळाली आहे.• मानोली, चांदोली, कासार्डे, पालेश्वर या लघु पाटबंधारेसह कडवी व कासारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. उघडझाप पावसामुळे डोंगर माथे हिरवळीत बहरत आहेत.

अधिक वाचा: किती पाऊस पडला हे कशाने व कसे मोजले जाते?