तासगाव शहरासह परिसरातील गावांना जोरदार गारपिटीने झोडपले. यावेळी सुमारे तीन इंचापेक्षा मोठ्या आकारांच्या दगडासारख्या गारा पडल्या.
इतक्या मोठ्या आकाराच्या गारा पहिल्यांदाच या परिसरात पडल्या. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
मंगळवारी दिवसभर उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी पाच वाजल्यानंतर हवामानात बदल झाला. ढगाळी वातावरण दिसत होते.
दरम्यान, सात वाजल्यानंतर तासगाव शहरासह वासुंबे, कवठेएकंद, नागाव, परिसरात वादळी वारे आणि गारपिटीला सुरुवात झाली. तीन इंच आकाराच्या गारा पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
सुरुवातीला पावसापेक्षा गारांचेच प्रमाण जास्त होते. इतक्या मोठ्या आकारांची गारपीट झाल्यामुळे वासुंबे, कवठेएकंद परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.
अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यूआरग (ता. मिरज) येथे अंगावर वीज पडून उदय विठ्ठल माळी (वय ३३, रा. अशोकनगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नाईकवस्ती विजापूर रोड, आरग येथील शेत शिवारात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. उदय माळी हे मंगळवारी सायंकाळी शेतात कामानिमित्त गेले होते. यावेळी उदय माळी यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
अधिक वाचा: मेंढरं चारणारा बिरदेव युपीएससीच्या रँकमध्ये झळकला; चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा