औरंगाबाद जिल्ह्याला आज (१५) पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी सुमारे आठ ते बारापर्यंत पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज (१५) व उद्या (१६) वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता जिल्हा हवामान केंद्राने वर्तवली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहणार असून १६ व १७ सप्टेंबर रोजी व्यापक प्रमाणात पाऊस होणार असून त्यानंतर 20 तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार, 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल व किमान तापमान सरासरी एवढेच असेल.
शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?
शेतकरी बांधवांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व काढणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच शेतात लवकर वापसा व्हावी, यासाठी पिकात व फळबागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला आहे.