Join us

Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस, उजनी धरणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:14 AM

Ujani Dam गेल्या दोन दिवसांपासून भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने उजनीवरील १९ धरणांच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

टेंभुर्णी : उजनीकडे येणाऱ्या बंडगार्डन व दौंड विसर्गात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता बंडगार्डन येथून १३ हजार ८३० क्युसेक तर दौंड येथून १२ हजार ५२४ क्युसेक विसर्ग सुरू होता. दौंड विसर्गात सायंकाळी ६ वाजता वाढ होऊन २१ हजार ८९३ क्युसेक विसर्ग झाला आहे.

दौंड येथील विसर्गात वाढ झाल्याने उजनी पाणी पातळी झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. सोमवार दि. १५ रोजी सकाळी ८ वाजता उजनी धरणाचीपाणी पातळी वजा ३३.५२ टक्के एवढी झाली होती.

वाढलेल्या विसर्गामुळे सायंकाळी वजा ३३.१७ टक्के पाणी पातळी झाली आहे. उजनी पाणलोट क्षेत्रातील भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस चालू असल्याने कळमोडी, वडिवळे, खडकवासला ही धरणे ५० टक्केपेक्षा जास्त भरली असून पानशेत व कासारसाई ४० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने उजनीवरील १९ धरणांच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

३ धरणांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीउजनीच्या वरच्या बाजूला असलेल्या १९ पैकी ३ धरणांचा पाणीसाठा ५० टक्केपेक्षा जास्त झाला आहे. कळमोडी ७६,५९, वडिवळे ७२.७२, खडकवासला ६४.७५ टक्के भरली आहेत. तर पानशेत ४४ टक्के, कासारसाई ४१.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. निरा खोऱ्यातील गुंजवणी ५० टक्के भरण्याचा मार्गावर असून या धरणाची टक्केवारी ४२.८५ टक्के झाली आहे.

उजनी धरणात ४५.८९ टीएमसी पाणीसाठाभीमा खोऱ्यातील वडीवळे धरण क्षेत्रात १०५ मिमी, पवना ८१, मुळशी ६३, टेमघर ६३, कासारसाई ४०, वरसगांव ३४ व पानशेत ३५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर निरा खोऱ्यातील गुंजवणी ३२ मिमी, निरा देवघर ३८ मिमी. अतिवृष्टी झाली आहे. यावर्षी प्रथमच बंडगार्डन येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला असून यामुळे सायंकाळपर्यंत दौंड विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सध्या उजनी धरणात ४५.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :उजनी धरणपाणीधरणसोलापूरदौंडपुणेखडकवासला