सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्यातील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत असल्याने भोजापूर धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचा शुक्रवारी (दि.८) दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने आठवडे बाजारावर त्याचा परिणाम झाला. यावर्षी म्हाळुंगी नदीला पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव तसेच म्हाळुंगी नदीचे उगमस्थान असलेल्या विश्रामगड परिसरात गुरुवारी मध्यरात्री व शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. म्हालुंगी नदीला पूर आल्याने ठाणगाव पासून सोनेवाडी पर्यंत असलेले सर्व छोटे मोठे बंधारे पूर्णपणे भरुन सायंकाळच्या सुमारास क्युसेसने भोजापूर धरणात पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळ पर्यंत धरणात ७२ टक्के म्हणजे २६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे.
पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास दोन दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरु शकते अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. गुरुवारी मध्यरात्री फारसा पाऊस झाला नसला तरी शुक्रवारी दिवसभर पावसाच्या झडी सुरु होत्या. तब्बल दोन महिन्याच्या खंडानंतर पाऊस झाल्याने काही भागात खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळणार आहेत. आणखी मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहेत.