Join us

सांगली जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस द्राक्षबागा, खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 1:29 PM

बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मणेराजुरी गावाला गारांचा जोरदार तडाखा बसला, तर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले.

तासगाव : बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मणेराजुरी गावाला गारांचा जोरदार तडाखा बसला, तर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले.

गारा पडल्याने मणेराजुरी भागातील द्राक्ष बागांच्या काड्या व फुटलेले कोंब मोडले. गारांच्या माऱ्याने पाने फाटत त्याची चाळण झाली. तर वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने पिके जमीनदोस्त झाली.

येत्या आठ दिवसांत तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात वादळवाऱ्यासह परतीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळवाऱ्यासह तासगाव तालुक्यातील लोढे, कौलगे, सावर्डे, चिंचणी, मणेराजुरी, खुजगाव, वाघापूर, आरवडे, बस्तवडे तुरची, राजापूर यांसह तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपले.

मणेराजुरी भागात दहा मिनिटे गारांचा तडाखा बसला. या गारांमुळे फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले. डोळे फुगलेल्या व फुटत असलेल्या द्राक्ष बागांच्या काड्यांचे डोळे गारांच्या माराने मोडून पडले.

तर काही द्राक्ष बागांची पाने गारांच्या माऱ्याने फाटली असून शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. काढणीचा खरीप पाण्यात कुजत असून वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके जमीन दोस्त झाल्याचे चित्र होते.

हातनूर परिसरात वादळी वाऱ्याने झाडे पडलीहातनूर (ता. तासगाव) येथे मंगळवारी पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक झाडे यावेळी रस्त्यावर उन्मळून पडली. त्यामुळे वाहनांना मोठा अडथळा आला होता. हातनुर, विसापूर, हातनूर गोटवडी रस्त्यावर तसेच शेतात अनेक झाडे पडली तसेच ऊस, हायब्रीड ज्वारी यासारखी पिके भुईसपाट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

टॅग्स :पाऊसहवामानगारपीटसांगलीखरीपपीकद्राक्षेतासगाव-कवठेमहांकाळ