Join us

ढगफुटीला मदत पण फ्लॅश दुष्काळाचं काय?

By नितीन चौधरी | Published: September 26, 2023 10:04 AM

ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे ३१ जिल्ह्यांतील १९४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे निकष लागू होतात. फ्लॅश फ्लड अर्थात ढगफुटीसारखी स्थिती जाहीर केली जात असताना फ्लॅश ड्रॉट अर्थात फ्लॅश दुष्काळ अशी स्थिती जाहीर करण्याबाबत अनास्था असल्याने 'सुकाळात विसरले दुष्काळ' अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करावा लागणार नाही, यामुळे राज्यकर्ते, अधिकारी सुखावले आहेत. ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे ३१ जिल्ह्यांतील १९४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे निकष लागू होतात. फ्लॅश फ्लड अर्थात ढगफुटीसारखी स्थिती जाहीर केली जात असताना फ्लॅश ड्रॉट अर्थात फ्लॅश दुष्काळ अशी स्थिती जाहीर करण्याबाबत अनास्था असल्याने 'सुकाळात विसरले दुष्काळ' अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे हतबल शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहेत.

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी २०१६ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात २०१८ मध्ये बदल करण्यात आला. त्या निकषानुसार दुष्काळ जाहीर करताना सर्वांत लहान एकक तालुका समजले जाते. या ठिकाणी सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस, हलक्या जमिनींसाठी तीन आठवड्यांचा तर भारी जमिनीसाठी चार आठवड्यांचा पावसाचा खंड, तसेच पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट, तसेच केंद्र सरकारने दिलेल्या पीक स्थिती पाण्याची स्थिती गृहीत धरून दुष्काळ जाहीर केला जातो. राज्यात असे १९४ तालुके दुष्काळाचे निकष पूर्ण करत असले तरी यासंदर्भात सप्टेंबरअखेर अहवाल तयार होणार आहे. 

असा होतो दुष्काळ जाहीर- गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे हा निकष या पावसात वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरीय देखरेख समिती काम करते. यानंतर हा अहवाल कृषी आयुक्तांवर राज्य सरकारकडे येतो व दुष्काळ जाहीर केला जातो. यंदा राज्यात मान्सूनने उशिराने हजेरी लावली. त्यामुळे उडीद, मूग या पिकांची पेरणी करता आली नाही. - दीड महिना पावसाने दडी मारली. शेतात तरारलेली पिके सुकू लागली. सोयाबीन, मका ही महत्त्वाची खरीप पिके या पावसाच्या खंडात अडकली. त्यामुळे या पिकांच्या उत्पादनात राज्यात सरासरी ३० ते ५० टक्के घट होण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञ गजानन जाधव यांनी व्यक्त कला आहे. काही जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती अत्यंत भीषण आहे. तेथे उत्पादनात किमान ५० ते ८० टक्के घट आहे.

पीक उत्पादनातील घट नोव्हेंबरमध्ये कळणार- पुण्यातील पाच ते सहा तालुक्यांमध्ये खरिपातील बाजरी यंदा पेरताच आली नाही. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवड या तालुक्यामध्ये खरिपात कांदा लागवड झालीच नाही. नगर, सोलापूर जिल्ह्यांतही हीच स्थिती आहे. त्याचा थेट परिणाम नोव्हेंबरमधील उपलब्ध होणाऱ्या कांद्यावर होणार आहे.- मागणीपेक्षा अत्यल्प पुरवठा असल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडणार यात शंका नाही. सोलापूर जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांची लागवड झाली नसल्याने नोव्हेंब रमध्ये उपलब्ध होणारी डाळ अर्थात दिवाळीमध्ये डाळ अत्यल्प उपलब्ध होणार नसल्याने ग्राहकांना अवाच्या सव्वा दराने डाळ विकत घ्यावी लागणार आहे. जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये डाळवर्गीय पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हीच स्थिती मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये आहे.

दुष्काळी निकषात बसणारे तालुकेठाणे ३, पालघर ७, रायगड ९, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग ३, नाशिक १२, धुळे ३, नंदुरबार ४, जळगाव १४, नगर १२, पुणे ८ सोलापूर ९, सातारा १०, सांगली ६, कोल्हापूर ९, छत्रपती संभाजीनगर ७, जालना ५, बीड ८, लातूर १०, धाराशिव ७, नांदेड ३, परभणी १, हिंगोली २, बुलढाणा ६०, अकोला ६, वाशिम ४, अमरावती ७, यवतमाळ ७, वर्धा १, गोंदिया ३, चंद्रपूर २, एकूण १९४

- दुष्काळ जाहीर करण्यासाठी तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस व चार आठवडे पावसाचा खंड आवश्यक.- राज्यात १९४ तालुक्यांनी दुष्काळाचे निकष केले पूर्ण. मात्र सप्टेंबरअखेर अहवाल होणार तयार होणार आहे.

महिनाभराच्या पावसाच्या खंडामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. आताच्या पावसामुळे त्यात फारसा बदल होणार नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. - गजानन जाधव, कृषीतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर

पावसाळ्याच्या अखेरीस पाऊस झाला. १५ ऑगस्टनंतर होणारी कांदा लागवड झालीच नाही. आठवड्यात आलेल्या पावसाने केवळ शेत ओले झाले. या ओलीवर लागवडही करता येणार नाही. - नंदू पवार, वराडी, ता. चांदवड, जि. नाशिक

टॅग्स :दुष्काळपाऊसमहाराष्ट्रराज्य सरकार