Join us

Ujani Dam इतिहास घडला; 'उजनी'चा साठा उणे इतक्या टक्क्यांवर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 9:18 AM

उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज कमालीची घट होत आहे. धरण सध्या मायनस ५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या ४१ विविध योजनांपैकी जवळपास सर्वच योजना आता बंद करण्यात आल्या आहेत.

कुर्डूवाडी : उजनी धरणाच्यापाणी पातळीत दररोज कमालीची घट होत आहे. धरण सध्या मायनस ५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या ४१ विविध योजनांपैकी जवळपास सर्वच योजना आता बंद करण्यात आल्या आहेत.

यामुळे सोलापूर, पुणे, नगर व धाराशिव या चार जिल्ह्यांची भविष्यातील पाण्यासाठी धक धक वाढली आहे. सोलापूर शहरासाठी २२ मे पर्यंत भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार असून, सध्या चार हजार क्युसेसने ते सुरू आहे. सोलापूर, पुणे जिल्ह्यासह उजनी धरण क्षेत्रात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही.

त्यामुळे उजनी धरण केवळ ६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. सध्या जिल्हाभर दुष्काळाची दाहकता वाढत असून, उन्हाची तीव्रतादेखील वाढली आहे. उजनी धरणावर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा होणाऱ्या योजनाही उजनीची पातळी खूपच खालावल्याने बंद केल्या गेल्या आहेत.

सोलापूर, पुणे आणि जिल्हाांसह अहमदनगर मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. इतिहासात प्रथमच तालुका नीचांकी पाणीसाठा अनुभवत आहे.

२०२३ मध्ये अल्प पर्जन्यमानामुळे धरणात साठलेल्या पाणीसाठ्याचे कमी प्रमाण, त्यात सातत्याने होणारा पाण्याचा उपसा, बाष्पीभवन यांसारख्या विविध कारणांनी उजनी धरणाची पाणी पातळी वरचेवर घटत चालली आहे. त्यामुळे जलाशयावर अवलंबून असलेले शेती सिंचन अडचणीत आले आहे. 

उजनी धरणाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. धरणाची पाणी पातळी उणे ५७ टक्क्यांवर पोहोचली असून बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठा योजनांसाठी दर आठ दिवसांनी अंदाजे एक टीएमसी पाणी खर्च होत आहे. यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उजनी धरण बांधल्यापासून ही नीचांकी पातळी असल्याचे बोलले जात आहे. यंदाची स्थिती अत्यंत वाईट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी उन्हाळा, पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी चिंताजनक जाण्याची दाट शक्यता आहे. याचा प्रत्यय आतापासूनच येत आहे.

पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याने उजनी धरणावर अवलंबून असलेल्या अनेक गावांत सध्या दुष्काळजन्य स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी धरणातून ६००० क्यूसेसने पाणी सोडले जात आहे.

सोडलेले पाणी पंढरपूरपर्यंत पोहोचले असून तीन-चार दिवसांत सोलापूरला पाणीपुरवठा करणान्या औज बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर पुन्हा चार-पाच दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहण्याचा अंदाज आहे. परिणामी उजनीची पातळी अत्यंत खोलवर जाण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी, शेतकऱ्यांनी पाण्याचा दुरुपयोग टाळावे.

अधिक वाचा: Koyna Dam सिंचन मागणी झाली कमी; कोयना धरणात किती टीएमसी पाणी शिल्लक

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीदुष्काळपाऊससोलापूरमराठवाडाशेतकरीशेती