पावसाच्या आगमनाची आपण वाट पाहू लागतो तेव्हा अनेकदा एक शब्द आपल्या कानावर पडत असतो, तो म्हणजे 'एल निनो' हा मूळ स्पॅनिश शब्द, याचा अर्थ, 'लहान मुलगा', साधारण पंधराव्या शतकात, पेरू देशातील मच्छिमारांनी हा शब्द प्रचलित केला.
डिसेंबरच्या दरम्यान त्यांना त्यांच्या किनारपट्टीवर, म्हणजेच दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर नेहमीपेक्षा जास्त अशा गरम पाण्याचा अनुभव आला, हा ख्रिसमसचा काळ. त्यामुळे त्यांनी या प्रकाराला, देवाचा लहान मुलगा-'एल निनो' असे नाव दिले. 'एल निनो' या वातावरणीय प्रकारामध्ये एकूण तीन स्थिती असतात.
सामान्य परिस्थिती, 'एल निनो' स्थिती आणि 'ला नीना' स्थिती. 'ला नीना' म्हणजे लहान मुलगी, हा देखील स्पॅनिश शब्दच. हे दोघे बहीण-भाऊ जरी नावाने लहान असले, तरी त्याचे प्रताप मोठे आहेत.
जगभरातील, विशेषतः विषुववृत्तीय देशातील आणि दक्षिण गोलार्धातील भूखंडांमध्ये होणाऱ्या पावसाशी याचे जवळचे नाते आहे. चारशे वर्षांपूर्वी मच्छिमारांनी पाडलेले हे नाव, वैज्ञानिक भाषेतही थोड्या फरकाने तसेच वापरले जाते.
'पएल निनों-सदर्न ऑसिलेशन सामान्य परिस्थितीमध्ये, प्रशांत महासागरातील गरम झालेले पाणी पूर्व दक्षिणी व्यापारी वाऱ्यांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाच्या दिशेने सरकते आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. परिणामी येथे पाऊस पडतो.
ज्यावेळी 'एल निनो' परिस्थिती तयार होते त्यावेळी, प्रशांत महासागरातील गरम पाणी वाहून नेणाऱ्या व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो आणि ह गरम पाणी दक्षिण अमेरिकेच्या दिशेने पेरू, अर्जेटिना या देशांच्या दिशेने सरकते आणि त्यांना किनारपट्टीवर गरम पाण्याचा अनुभव येतो.
साधारणपणे २ ते ७ वर्षांनी हा 'एल निनो'चा परिणाम अनुभवायला मिळतो; पण त्यात सातत्य नाही. तिसऱ्या 'ला नीना' स्थितीत अधिक तीव्र रूप पाहायला मिळते, म्हणजेच पूर्व दक्षिणी व्यापारी वारे जास्त प्रभावी होतात आणि प्रशांत महासागरातले गरम पाणी अधिक मोठ्या प्रमाणात पश्चिमेकडे म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या दिशेने घेऊन जातात. परिणामी त्या भागात अधिक पाऊस पडतो.
'एल निनो' परिस्थिती असताना भारतात पर्जन्यमान अत्यंत कमी होते. मागच्या वर्षी २०२३-२४ दरम्यान अनुभवलेला 'एल निनो' परिणाम एका अत्यंत तीव्र परिणामांपैकी एक होता, त्याच्या परिणामी आपल्याकडे आक्रसलेला पावसाळा आपण अनुभवला. 'एल निनो'चा प्रभाव साधारणपणे नऊ महिने ते एक वर्ष असतो. सामान्य परिस्थिती आणि 'ला नीना' प्रभावी असताना भारतात पर्जन्यमान अधिक असते.
याची कारणे, प्रशांत महासागरातून येणाऱ्या विशिष्ट अशा वाफेच्या ढगांच्या प्रवासात दडलेली आहेत. 'ला नीना' परिणाम सुरू असताना हे वाफ भरलेले ढग मोठ्या प्रमाणात भारताकडे सरकतात, 'एल निनो' काळात या वाफ भरल्या ढगांना ढकलायला म्हणावा तसा तीव्र दाब दक्षिणेकडून न मिळाल्याने भारतात पर्जन्यमान कमी होते.
यावर्षीच्या मेपर्यंत 'एल निनो' चा प्रभाव कमी होईल आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत होईल असा अंदाज होता. त्याप्रमाणे एप्रिल-मे-जूनचा ओशियानिक निनो इंडेक्स ०.५ या निर्देशांकाच्या खाली आला; पण जरी 'एल निनो' परिस्थिती निवळली असली तरी, त्याचा प्रभाव अजून काही आठवडे जाणवत राहील ज्यामुळे भारतीय पर्जन्यमान थोडे दोलायमान होऊ शकते.
हवामान बदलाचे तीव्र परिणाम भोगावे लागणाऱ्या भारतासारख्या देशांना आणि आपल्यासारख्या कृषिप्रधान परिसराला पावसाच्या या अस्थिरतेचा जोरदार फटका बसतो. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाची आणि पारंपरिक लोकज्ञानाची सांगड घालून आज ५ जुलै जलसंपत्ती दिनानिमित्त अधिक सक्षम आणि लवचिक अशा पाणी धोरणाची आणि हवामान अंदाजाची गरज येथे व्यक्त करणे योग्य ठरेल.
डॉ. रसिया पडळकर