Join us

किकुलॉजी : 'चांद्रयान ३' मोहीम, बदलणारे हवामान आणि चंद्रावरच्या शेतीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 8:22 PM

(किकुलॉजी, भाग ६) शेतकऱ्यांनी हवामान तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे हे लेखन!

'चांद्रयान ३' मोहीम यशस्वी ठरल्यानंतर अमेरीका, रशिया, चीन नंतर भारत हा चंद्रावर पोहोचलेला चौथा देश ठरला आहे. हि गोष्ट खरी आहे की पृथ्वीवरील शेतीबाबत अडचणी तसेच शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम आवश्यक आहे. असे असले तरी चंद्र आणि सूर्याला गवसणी घालणे आणि तेथील डेटा गोळा करणे ही गोष्ट हवामानाची अचूक माहिती देत जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक आहे. याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. २०२३ पासून २०३५ म्हणजे पुढील १२ वर्षातील भारत आणि एकंदर जगाच्या बदलत्या हवामानाचा वेध घेण्यासाठी अंतराळातील सॉफ्ट एक्स रे तसेच हार्ड एक्स रे यांसह इतरही विविध घटकांची माहिती आवश्यक आहे.

पाणी उपलब्धता, मात्र वारा नसणे ही बिकट वाट आहे. विक्रम लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ६९.३७ अक्षांश आणि ३२.३५ पूर्व रेखांशावर उतरल्यावर सेन्सरने दिलेल्या चंद्राच्या तापमान आलेखातील माहिती धक्कादायक आहे. चंद्र पृष्ठभागावरील ७० अंश सेल्सिअस तापमान आणि जमिनीखाली अवघ्या तीन सेंटिमीटर अंतरावर ५० अंश सेल्सिअस तर आठ सेंटिमीटर अंतरावर उणे १० अंश सेल्सिअस ही तापमानातली प्रचंड तफावत हे शेती करण्यासाठी अत्यंत आव्हानात्मक काम असले तरी नजिकच्या काळात त्यावर उपाय सापडतील याबाबत शंका नाही.

पृथ्वीच्या जमिनीवर! कृषिक्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते, जे भारतीय जीडीपीमध्ये स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ५१.७, तर सध्या सुमारे १३.७ टक्के हिस्सा प्रदान करते आहे. पण भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ५२ टक्के भाग शेतीक्षेत्रात गुंतलेला आहे. भारतातील शेतजमीन क्षेत्र १५ कोटी ९७ लाख हेक्टर आहे. अमेरिकेनंतर जगातील हे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे शेतीक्षेत्र आहे. ८ कोटी २६ लाख हेक्टर इतके सिंचनाखाली असलेले भारतीय शेती हे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. जगातील लोकसंख्या आणि अन्नाची मागणी वेगाने वाढते आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्धतेच्या अन्नधान्याची होत असलेली मागणी जास्त आहे.

महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६४.१४ टक्के केवळ शेतकरी आहेत. २०१५-१६ च्या कृषी गणनेनुसार किमान १५ कोटी ३० लाख शेतकरी आहेत. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर ८३.२ टक्के (८९.८२ टक्के पुरुष आणि ७५.४८ टक्के स्त्रिया) असा आहे, ही चांगली गोष्ट आहे. यासाठी नवनवीन येत असलेले तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा आपल्या शेतीसाठी कसा वापर करता येईल याचा विचार आजच आपण सुरू करायला हवा.

चांद्रयान मोहीम का महत्त्वाची? भारताचे मान्सून मिशनचे शेतकरी हितासाठीचे बजेट १२०० कोटी इतके आहे. त्यापेक्षा‌ निम्मे म्हणजे जवळपास ६०० कोटी बजेटची चांद्रयान मोहीम का महत्त्वाची आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणे स्वाभाविक आहे. मात्र आपण समजून घ्यायला हवे की पृथ्वीवरील लोकसंख्या वाढ आणि अन्नसुरक्षेच्या आव्हानसह आपल्या अवतीभवतीचा परिसर म्हणजे पर्यावरण हे आजचे 'न्यू नॉर्मल' आहे.

शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन देखील आज एक तृतीयांश इतकी लोकसंख्या उपाशी झोपते आहे. सध्या जगात किमान रोज किमान २ अब्ज ६९ कोटी लोक उपाशीपोटी झोपत आहे व १५ कोटीपेक्षा जास्त लोक कुपोषित आहेत. त्यांना अन्नपुरवठा न झाल्यास दररोज ३ लाख लोक जगात मरतील, असे संयुक्त राष्ट्र संघाचे म्हणणे आहे. परिणामी मानवजात ही पृथ्वीवर 'खायला काळ भुईला भार' बनत आहे. परिणामी 'जेनेटिक मॉडिफिकेशन' करीत तंत्रज्ञानाच्या मिलाफातून 'संकरित मनुष्ययंत्र' मानवी वाण विकसित होत आहे.

निसर्ग सर्व गोष्टी भेदभाव न करता बॅलन्स म्हणजे संतुलित करीत असतो. १७२० च्या प्लेग, १८२० मध्ये कॉलरा, १९२० मध्ये स्पॅनिश फ्लू आणि २०२० मध्ये कोरोना विषाणू असा दर शंभर वर्षांनी येत आहेत. एवढे होऊन देखील आज पृथ्वीवरची लोकसंख्या सतत प्रचंड वाढतच आहे. लोकसंख्या वाढ आणि अन्नसुरक्षेच्या आव्हानसह आपल्या अवतीभवतीचा परीसर म्हणजे पर्यावरण हे आजचे 'न्यू नॉर्मल' आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स व नॅचरल इंटेलिजन्स यांचा 'हायब्रिड माणूस' हा वाढत जाणारी लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतानुसार लायकच या जगात टिकतात व टिकवणे गरजेचे हे अंतिम सत्य स्विकारण्याशिवाय दुसरा ऑप्शनच उपलब्ध नाही.

लोकसंख्येचा वाढता आलेखइसवीसन पूर्व ५००० ला संपुर्ण पृथ्वीवर केवळ ५० लाख मानवी संख्या होती. सहा हजार वर्षांनंतर सन १००० मध्ये ती २७ कोटी झाली. २००० साली ६.२ अब्ज म्हणजे अवघ्या १००० वर्षात जवळपास २३ पट वाढली. इसवी सन २०० ते सन १९०० या ७०० वर्षात जेवढी लोकसंख्या वाढली, तेवढीच लोकसंख्या २००० ते २०१९ या अवघ्या १९ वर्षात वाढत सुमारे १ अब्ज ५८ कोटी इतकी वाढली. वर्ल्डोमीटरने स्पष्ट केलेल्या सर्वात अलीकडील युनायटेड नेशन्सच्या माहितीनुसार, शनिवार २६ ऑगस्ट २०२३ पर्यंत सध्याची जगाची लोकसंख्या ८ अब्ज ५ कोटी ६५ लाख ४० हजार ८३३ इतकी आहे.

किकुलॉजीचे हेही भाग वाचा

धोक्यांचे आव्हान आणि संधींचा खजिनाआता मानवजात ही धोक्यांचे आव्हान आणि संधींचा खजिना- अशा अवस्थेत आहे. धोका निर्माण झाला आहे तो आपल्या कर्मामुळे! आणि वाढलेल्या लोकसंख्येची क्रयशक्ती वापरून आव्हानांना परतावून लावण्यासाठी संधी देखील आहे. जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा होतो. वर्ल्डोमीटर माहितीनुसार २६ ऑगस्ट २०२३ पर्यंत भारताची लोकसंख्या १ अब्ज ४३ कोटी ०६ लाख २७ हजार २०५ इतकी आहे. भारताच्या बाबतीत चांगली गोष्ट ही आहे की या लोकसंख्येतील २२ टक्के भाग हा १८ ते २९ वर्षे वयोगटातील चैतन्यमयी सळसळत्या तारूण्य वयाचा झरा आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नसुरक्षेचा धोका व गुन्हेगारी दर वाढतो आहे हे वास्तव आहे. जगातील ९९ टक्के संपत्ती ही केवळ एक टक्का धनाढ्य स्वत:च्या खिशात बाळगतात व संपूर्ण जग नियंत्रित करतात ही वस्तुस्थिती आहे. विषमता वाढत असून भारताच्या २०१९ च्या अर्थसंकल्पाएवढी रक्कम भारतातील केवळ ६३ अब्जाधीशांकडे आहे. भारतातील एक टक्का श्रीमंतांकडे देशातल्या ७० टक्के लोकांकडची असते तेवढी रक्कम एकवटली आहे. विकासाच्या गप्पामारत पृथ्वीवरील लोकसंख्येला जास्त काळ उपाशीपोटी ज्ञानाच्या गप्पा मारत भुलविण्याचे काम दिर्घकाळ केवळ अशक्य आहे.

जमीन मर्यादित आहे आणि यामुळेच शेतकरी हा अज्ञानी राजा आहे. पृथ्वीची जमीन लवकरच कमी पडणार आहे आणि यामुळेच रासायनिक खते तसेच हायब्रीड बियाणे यांच्यामुळे खराब न झालेली चंद्राची आणि मंगळ ग्रहावरील जमीन केवळ महत्वाची नाही तर नैसर्गिक शेतीसाठी अमूल्य खजिनाच आहे. म्हणूनच नजिकच्या काळात पृथ्वीवरील रासायनिक खतांची खराब झालेल्या जमिनीवर तोकडा अथवा पर्याय म्हणून स्वप्नवत वाटत असली तरी,  चंद्रावर माणसाच्या दीर्घायुष्यासाठी सेंद्रिय शेतीसाठी पावले उचलणे आवश्यक आहे. यासाठीच आता गरज थेट चंद्रावरच्या शेतीचीच!

-प्रा किरणकुमार जोहरे आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ व हवामान शास्त्रज्ञ मो. नं. 9168981939, 9970368009kirankumarjohare2022@gmail.com

टॅग्स :हवामानशेतीशेतकरी