हवामान अंदाज बांधणं जोखमीचं काम. भविष्यातील हवामानाचा अचूक अंदाज लावण्यासाठी जगभरातील हवामान केंद्रे, हवामान उपग्रह तापमान, हवेचा दाब, आर्द्रता, पर्जन्य, वाऱ्यावा वेग अशी बरीच हवामान निरिक्षणे गोळा करत असतात. पण नक्की हा अंदाज कसा वर्तवला जातो? हा अंदाज वर्तवण्याच्या काय पद्धती आहेत? जाणून घ्या
राज्यात सध्या अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात येत असून गारपीट, वाढते तापमान अशा टोकाच्या हवामान बदलांना आपण सर्वजण सामोरे जात आहोत. नुकताच भारतीय हवामान विभागाने मान्सूनमध्ये १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला. अशा दीर्घकालिन काळाच्या हवामान अंदाजाचे पूर्वअनुमान कसे दिले जाते?
जागतिक हवामान संघटनेने व्याख्येनुसार, अंदाजे ३० दिवसांपासून एका हंगामाचा अंदाज हा दीर्घाकालीन हवामानाचा अंदाज असतो. मान्सूनचे किंवा कोणत्याही हंगामाचा दीर्घकालिन पूर्वअनुमान वर्तवण्यासाठी हवामान विभाग वेगवेगळ्या पद्धती वापरते.
यात सर्वसाधारण ३ पद्धती वापरल्या जातात.
१. सांख्यिकी पद्धत
२. डायनॅमिकल पद्धत
३. डायनॅमिकलसह सांख्यिकी पद्धत
हंगामी किंवा दीर्घकालिन पूर्वअनुमान करण्यासाठी मुख्यत: सांख्यिकी पद्धतीचा वापर केला जातो. हवामान विभाग मान्सूनच्या पावसाचे पूर्वअनुमान या तंत्रावरच आधारित आहे.
वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भारतासारख्या देशात अचूक हवामान अंदाज देण्यासाठी भक्कम सांख्यिकी निरिक्षणांचा आधार घेतला जातो. एखाद्या प्रदेशात भविष्यात होणारा पर्यावरणीय बदल त्या भागातील आधीच्या बदलांशी जोडून पाहिला जातो. ते निरिक्षण भविष्यातही टिकून राहणारे असेल तर त्यावरून हवामानाचा अंदाज बांधण्यात येतो.
हवामान विभागाकडे विविध प्रदेशांमधून येणाऱ्या माहितीमध्ये हजारो किंवा लाखो व्हेरिएबल किंवा सांख्यिकी माहिती असते. या माहितीला वेगवेगळ्या मॉडेल्सच्या अंतर्गत विभागले जाते. सतत बदलणाऱ्या हवामानाच्या स्थितीची गणितीय समिकरणे इतकी गुंतागुंतीची असतात की त्याला सुपर कम्प्यूटच्या मदतीने चालवले जाते. या समिकरणांवर आधारित अंदाजाला अंकीय हवामान अंदाज म्हणतात.
डॉयनॅमिकल कम सांख्यिकी पद्धत वस्तूस्थितीवर आधारित आहे. मॉडेल्स किंवा अंकीय हवमान अंदाज व प्रत्यक्षात त्या भागात असणारे हवामान यात काहीशी तफावत असते. त्यामुळे विवध जागतिक व प्रादेशिक अशा विविध क्षेत्रांमध्ये वेगळे हवामानाचे अंदाज असतात.