बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता इशान्य भारतात असल्याचे नुकतेच हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, राज्यातून मान्सूनने माघार घेतल्याचे चित्र असून तापमानाचा पारा वाढू लागला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची बदलेली दिशा परिणामी तापमानात होणारी वाढ यामुळे परतीच्या पावसाची राज्यात काय स्थिती असेल?
राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतल्यानंतर हळूहळू आजूबाजूच्या राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या दक्षिण व मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून साधारण १० ऑक्टोबरपर्यंत परतेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून साधारण १७ सप्टेंबर दरम्यान सुरू होत असतो. यंदा आठवडाभर उशिरा परतीचा प्रवास सुरू झाला असून आत्तापर्यंत संपूर्ण राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून परतला आहे. येत्या दोन-तीन दिवसात परतीचा हा प्रवास आणखीन वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
येत्या दोन दिवसात राज्यातून मान्सून माघारीस पोषक वातावरण असेल असे हवामान विभागाने वर्तवले असले तरी राज्यात येत्या काळात परतीचा पाऊस कमीच असेल अशी शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रब्बीसाठी पेरते होण्याची वेळ आली असून पुढील पंधरा दिवसात रब्बी पिकांची लागवड करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.येत्या काही दिवसात परतीचा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे. तसेच हवामान कोरडे राहणार असल्याने उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.