Join us

उजनी धरण भरण्यास अजून किती पाणी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 1:07 PM

सायंकाळपासून दौंड येथून उजनीच्या दिशेने येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून २४७०१ क्युसेकने विसर्ग चालू आहे.

पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाटमाथ्यावर मागील २४ तासांत दमदार पाऊस झाला असून, उजनीच्या वरील सात धरणांतून सोडलेले पाणी शनिवारी दौंड येथे पोहोचले आहे. सायंकाळपासून दौंड येथून उजनीच्या दिशेने येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून २४,७०१ क्युसेकने विसर्ग चालू आहे. हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता उजनी धरण प्रशासनाने व्यक्त केले आहे. यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तीन-चार दिवस असाच पाऊस चालू राहिल्यास उजनी धरण शंभर टक्के भरण्याचा अंदाजदेखील व्यक्त होत आहे.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, मागील २४ तासात १९ पैकी १५ धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. वरील धरणे अगोदरच पूर्ण क्षमतेने भरत आल्याने आता पडत असलेल्या पावसाचे पाणी सरळ उजनीच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजही उजनी धरणाच्या वरील सात धरणांतून १५,५४० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी सोडलेले पाणी शनिवारी सायंकाळी दौंड येथे पोहोचल्यामुळे दौंड येथून येणारा विसर्ग वाढून तो २४७०१ क्युसेक एवढा झाला आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

मागील २४ तासात उजनीच्या वरील धरण क्षेत्रात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. माणिक डोह २९ मिमी, वडज ३७ मिमी, डिंभे ७२ मिमी, कळमोडी ६३ मिमी, चासकमान ३९ मिमी, भामा आसखेड ५२ मिमी, वडिवळे ६७ मिमी, आंध्रा ४८ मिमी, पवना ९३ मिमी, कासारसाई २६ मिमी, मुळशी ६५ मिमी, टेमघर ५५ मिमी, वरसगाव ४३ मिमी, पानशेत ३८ मिमी व कळमोडी २० मिमी पाऊस पडला आहे. ही धरणे अगोदरच भरत आल्याने हे सर्व पाणी उजनीच्या दिशेने येणार असून, रविवारपासून दौंडमधून येणाऱ्या निसर्गामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विदर्भ, खानदेशात मोठी धरणे ओव्हर फ्लो

आणखीन ४३ टीएमसीची गरज.मागील वर्षी ९ सप्टेंबर रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणात १२३ टीएमसी एवढा जलसाठा झाला होता. मात्र, चालू वर्षी तो ७३.३७ टीएमसी एवढा असून, धरण १८.१३ टक्केच भरले आहे. उजनी धरण १०० टक्के भरण्यासाठी अद्याप ४३ टीएमसी तर पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ५० टीएमसी पाण्याची गरज आहे.

धरणाची सद्य:स्थितीएकूण पाणीपातळी - ४९२.३४० मीटरएकूण जलसाठा  - ७३.३७ टीएमसीउपयुक्त जलसाठा - ९.७१ टीएमसीटक्केवारी - १८.१३इन्फ्लो दौंड - २४७०१ क्युसेक

टॅग्स :धरणपाऊसदौंडपुणेपाणी