Join us

Katepurna Dam : पाणीसाठा काटेपूर्णा धरणात किती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 1:22 PM

काटेपूर्णा धरणात किती पाणी साठा उपलब्ध आहे ते पाहुया.

अनिस शेख मालेगाव परिसरात पाऊस सुरू असल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्यापाणीपातळीत सतत वाढ होत असल्याने मागील ९६ तासांपासून धरणाच्या दोन गेटमधून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. सद्यः स्थितीत धरणात ९४.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

१६ ते ३१ ऑगस्टदरम्यान जलाशय परिचालन आराखड्यानुसार धरणात ९५ टक्के जलसाठा आरक्षित ठेवून त्यावरील अतिरिक्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करावा लागतो. १७ ऑगस्ट रोजी दमदार पावसामुळे पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी दोन गेट एक फुटाने उघडून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यास सुरुवात झाली होती.

...म्हणून विसर्ग केला कमी

३६ तासांनंतर १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ९१.१२ टक्क्यांपर्यंत आल्याने विसर्ग ४८.२२ घ.मी. प्रति सेकंदावरून कमी करून २४.६० घ.मी. प्रतिसेकंदाने सुरू ठेवण्यात आला होता.

नदीकाठावरील नागरिकांना धोका

महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्यामुळे काटेपूर्णा नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे. कोणीही नदीतून जाणे- येणे करू नये आणि खबरदारी घ्यावी, असेही महान पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

धरणाचे आणखी गेट उघडण्याची शक्यता

मालेगाव परिसरातील कोंडाला, जऊलका रेल्वे, अमनवाडी, मुसळवाडी, धानोरा, फेट्रा या भागात झालेल्या पावसाचे पाणी काटा कोंडाला नदीतून धरणात येऊन मिसळते. मालेगाव परिसरात चांगला पाऊस सुरू असल्याने काटेपूर्णा धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणाचे आणखी गेट उघडून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीकपातपाणीधरणकाटेपूर्णा धरण