राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाली असून येत्या 48 तासात येथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाच ते सात सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, व गोव्यात तीन ते सात सप्टेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यताही आहे. हवामान विभागाचे पुणे येथील के. एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विटही केले आहे.
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राकडूनही मराठवाड्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, दिनांक ३ व ४ सप्टेंबर रोजी नांदेड लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. ५ ते ६ सप्टेंबर दरम्यान परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंगोली,परभणी व जालना जिल्ह्यात ७ तारखेला मुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहणार आहे. हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरी एवढे राहणार असून पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
आज 'या' भागात मेघागर्जनेसह मुसळधार
आज विदर्भासह, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगाना आणि कर्नाटकात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कोणत्या भागात येलो अलर्ट?
भारतीय हवामान विभागाने आज (दि. ३) उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ,अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला असून राज्यातील उर्वरित भागांना हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.