Join us

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातील थंडी कशी असेल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:27 PM

सध्या राज्यात तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत असून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.

सध्या राज्यात तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत असून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. अशातच आजपासुन पुढील आठवड्यातील म्हणजे १ फेब्रुवारीपर्यन्त महाराष्ट्रात थंडी जाणवणार असली तरी सध्या महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया अशा १२ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक) तर दुपारचे कमाल तापमान २६ डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी पेक्षा २ डिग्रीने  कमी) दरम्यानचे असु शकते, असं मत जेष्ठ निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

जेष्ठ निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार संबंधित जिल्ह्यांमध्ये पहाटेची थंडी त्यामानाने जरी कमी वाटत असली तरी दिवसाचा ऊबदारपणाही कमी जाणवण्याची शक्यताही अधिक आहे. म्हणून कमाल व किमान अशा दोन्हीही तापमानाच्या एकत्रित परिणामातून हिवाळ्याला साजेशी अशा थंडीचा अनुभव संबंधित जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. जळगांव जिल्ह्यात तर पहाटेचे किमान तापमान हे १० डिग्री से.ग्रेड च्या आसपास किंवा त्याखाली एकांकापर्यंतही घसरू शकते. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान २८-३० डिग्री से. ग्रेड म्हणजे दोन्हीही तापमाने त्यांच्या सरासरी इतके किंवा त्या पेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असु शकते. या आठवड्यादरम्यान महाराष्ट्रात थंडीच्या लाटीची शक्यता मात्र जाणवणार नाही, असे वाटते. 

              सध्याची महाराष्ट्रातील थंडी कशामुळे टिकून ?

सध्या उत्तर भारतात विविध कारणांनी जरी थंडी कमी जाणवत असली तरी उत्तर भारतात समुद्रसपाटी पासून दहा ते बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २८० किमी असे वेगवान प्रवाही झोताचे ' पश्चिमी' वारे पूर्वेकडे अजुनही वाहत आहे. या पश्चिमी झोताच्या परिणामातून त्या जाडीच्या पातळीखाली एकवटलेली संचित थंडी या तयार झालेल्या (धरणरूपी) स्रोतातून पाट-पाण्यासारखी प्रमाणात थंडी विनाअडथळा महाराष्ट्राकडे वाहत येत आहे. दि.२५ व २८ जानेवारी दरम्यान लागोपाठ दोन पश्चिमी झंजावात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात प्रवेशित होत आहे. पश्चिमी वारा झोत व पश्चिमी झंजावात अशा दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून तर कमी तीव्रतेची का होईना पण ती अधिक कालावधी दिवसाच्या वहनामुळे महाराष्ट्राला थंडीचा फायदा  होत आहे.

             शेतपिकावर कसा परिणाम होवु शकतो ? 

सध्या जानेवारीतील थंडी जरी कमी भासत असली तरी, चालु ' एल-निनो व कमी पर्जन्यमान वर्षाच्या रब्बी हंगामातील शेतपिकांना मात्र या 'जिवंत' अशा सातत्यपूर्ण थंडीतून मावा, बुरशी, कीडी पासूनचा होणारा आघात व तणे ह्यांपासून काहीशी सुटका तर मिळालीच व ती सुरक्षितही राहिली. भाजीपाला, भरडधान्ये शेतपिके, फळबागा उस व आल्यासारखी दिर्घकालावधीच्या पिकांना वातावरणीय अवस्था ही एक जमेची बाजूच समजावी. एकूणच टंचाई वर्षातील माफक थंडीचा हा हिवाळा सध्या पिकांना संजीवनी प्राप्त करून देत फार मोठी मदत करत असल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले आहे. 

पावसाचा काय अंदाज असु शकतो? 

सध्या एल -निनो तीव्रतेत आहे. आय.ओ.डी (भारत महासागरीय पाण्याच्या पृष्ठभाग उष्णतेची द्वि- ध्रुवीता) तटस्थेत तर एमजेओ (मॅडन व ज्यूलियन ची हवेच्या कमी दाबाची दोलणे) देशाच्या महासागरीय क्षेत्राच्या बाहेर पडली आहे. पावसासाठीची पूरकतता त्यामुळे ह्या आठवड्यात वजाबाकीत म्हणजे कमी झाली आहे. विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवड्यात म्हणजे गुरुवार १ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यताही जाणवत नाही. तर गुरुवार २५ जानेवारीपासून पुन्हा सध्या पडत असलेल्या थंडीसारखी थंडी पूर्ववत होण्याची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात फेब्रुवारी व मार्चमध्ये वातावरण असं असणार?            एक फेब्रुवारी नंतर दोन्हीही(फेब्रुवारी व मार्च) महिने ही गारपीट हंगामाचे असतात. तसेच वातावरणात त्या दरम्यान घडणाऱ्या 'वारा खंडितता'  प्रणालीतून पडणाऱ्या पावसाचे असतात. खरं तर येणाऱ्या दोन महिन्यातील या घटना त्या वेळी वातावरणीय काय प्रणाल्या असतील, त्यानुसार त्या वेळीच दहा दिवस, पंधरवडा अशा लघुपल्ल्याच्या तसेच प्रत्येक महिन्याच्या मिळणाऱ्या अंदाजातूनच याबाबत बोलणे योग्य होईल, असे वाटते.  सध्या अजूनही अधिक तीव्रतेतील ' एल- निनो ' ह्या घटनांना मारकही ठरू शकतो. म्हणूनच त्या घटना घडतीलच असा लगेचच अर्थ आजच काढू नये. फक्त हंगामी घडणाऱ्या वातावरणीय घटनांच्या कालावधीची आठवण असावी म्हणून उल्लेख केला असल्याचे खुळे यांनी शेवटी स्पष्ट केले आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…        

टॅग्स :हवामानपीकतापमानमहाराष्ट्र