गणेश पोळटेंभुर्णी : गेल्या दहा वर्षांनंतर उजनी प्रथमच जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले आहे. पुढचे पाच ते सहा महिने साधारण जून ते जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. मृत साठ्यातील ६३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा उजनीची वजा ५५ ते ६० टक्के पाणी पातळी खाली जाऊ शकते. १२ फेब्रुवारीनंतर महिनाभर कोणत्याही योजनेतून सोडण्यात येणार नाही. त्यानंतर मार्च आणि मे महिन्यात सोलापूर शहरासाठी १० टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
सध्या सीना-माढा उपसा सिंचन योजना बंद झाली आहे. भीमा-सीना जोड कालवा व उजनी मुख्य कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. ११ ते १२ फेब्रुवारीपर्यंत मुख्य कालवा सुरू राहणार आहे. उजनी धरणात त्यानंतर अंदाजे ५५ टीएमसी पाणी साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. उजनी वजा १८ ते २० टक्क्यांपर्यंत खाली जाऊ शकते, उजनी धरणातील वजा २५ ते ३० टक्के पाणी पातळीपर्यंत उजनी धरणातून मुख्य कालव्यातून पाणी सोडले जाऊ शकते.
मात्र, फेब्रुवारीनंतर राहिलेल्या पाण्याचे नियोजन कसे असेल याची चिंता सोलापूरला लागून राहिली आहे. उजनी धरणावर जिल्ह्यातील अनेक शहरांसह धाराशिव शहराची पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहती उजनी फुगवट्यावरील शेती अवलंबून आहे. विविध सिंचन योजना व कालव्यातून बंद झाल्यानंतर इथून पुढे उजनी ५० टक्के भरल्यानंतर शेतीसाठी पाणी मिळणार आहे.
राहिलेल्या पाण्याचे असे असेल नियोजन■ सोलापूरसाठी पहिली पाळी मार्च व दुसरी पाणी पाळी मे महिन्यात अशा दोन पाळ्यांत १० टीएमसी लागणार आहे.■ आषाढी वारीसाठी व सोलापूर शहराला पिण्यास एक अतिरिक्त पाणी पाळी सोडली जाऊ शकते, यासाठी ५ टीएमसी पाणी सोडले जाऊ शकते.■ उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन ५ ते ६ टीएमसी कमी होत असते.■ उजनी धरणातील गाळामुळे ८ ते १० टीएमसी पाण्याची तूट असल्याचे जाणकार व्यक्त्त करतात.■ ९६.१५ टीएमसी पैकी आतापर्यंत ३३.१५ टीएमसी पाण्याचा वापर १२ ऑक्टोबरपासून झाला आहे.■ उजनी धरण वजा ३५ टक्क्यांपर्यंत खाली गेल्यास सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलला पाणी कमी पडते. यासाठी महापालिकेला दुबार पंपिंगचा सामना करावा लागू शकतो.
अधिक वाचा: जाणून घ्या, कोयना धरण उभारणीपासून ते लेक टॅपिंगपर्यंतचा प्रवास
उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करा, वरच्या धरणातून उजनीत १० टीएमसी पाणी सोडा- उजनी धरणातून गरज नसताना नियम धाब्यावर बसवून सोडण्यात येत असलेले पाणी तत्काळ बंद करावे, उजनीच्या वरच्या धरणातून १० टीएमसी पाणी तत्काळ उजनीत सोडावे अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा करमाळा, इंदापूर, कर्जत, दौंड तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे दिला.- यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर, भारत साळुंके, आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, शहाजीराव देशमुख, अजित रणदिवे, राजेंद्र धांडे, नंदकुमार भोसले, केळी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद पाटील, इंदापूर तालुका धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष महारुद्र पाटील, विष्णू देवकाते, कुलदीप पाटील, दादा मोरे, विठ्ठल शेळके, महादेव नलवडे, सतीश राखुंडे आदी उपस्थित होते.