Join us

राज्यात पुढील पाच दिवस कसे असणार हवामान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 13, 2023 5:30 PM

राज्याला थंडीची प्रतिक्षा...

राज्यात हवामानात वारंवार बदल होत असताना राज्याला  आता थंडीची प्रतिक्षा आहे. नुकताच राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने कुडकुडत्या थंडीचा आनंद मावळला असताना पुढील पाच दिवस हवामान कसे असणार?

राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे व अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात  काढणीला आलेल्या पीकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी पेरण्यांच्या सुरुवातीला राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आले आहे.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती अंदमान समुद्र आणि मध्य व दक्षीण भागात असून कमी दाबाचा पट्टा वायव्य बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत तयार होण्याची शक्यता आहे.परिणामी, महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहणार आहेत. त्यामुळे हवामान ढगाळ राहण्याची शक्यता राहील.  

पुढील २ दिवसात तापमानात होणार घट

पुढील दोन ते तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. 

राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सियसने घट होऊन त्यानंतर १ ते २ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.

तापमानात वाढतेय...

राज्यातील बहुतांश भागात दिवसा तापमानाने कमाल ३० अंशांचा टप्पा ओलांडल्याचे चित्र असून जळगावात कमाल तापमानाने ३५.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमान १५ ते २५ अंशांच्या दरम्यान आहे.

अवकाळीने भातशेती पाण्यात

राज्यात नुकताच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवेळी पाऊस येऊन गेला. अनेक भागात कापणीला आलेल्या भातपीकाचे मोठे नुकसान झाले. तर कोरडवाहू पीकांना दिलासा मिळाल्याचे दिसून आले. हवामानात सतत बदल घडत असताना रब्बी पेरण्यांच्या तोंडावर मराठवाड्यात पुढील पाच दिवस  हवामान कोरडे राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवले आहे.

टॅग्स :हवामानशेतकरीरब्बीपाऊसमराठवाडा