पृथ्वीचे तापमान ३ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचे (जीडीपी) १० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते, असे एका अभ्यासात म्हटले आहे. गरीब आणि उष्ण हवामान असलेल्या देशांना याचा सर्वाधिक १७ टक्क्यांपर्यंत फटका बसू शकतो, असेही अभ्यासात म्हटले आहे.
स्वित्झर्लंडमधील ईटीएच झुरिक या संस्थेने हा अभ्यास केला. पृथ्वीचे तापमान वाढल्याचा सर्वाधिक परिणाम आफ्रिका आणि पश्चिम आशियातील देशांना बसेल. तापमान वाढ १.५ टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवल्यास अनुमानित आर्थिक नुकसान दोन तृतीयांशपर्यंत कमी केले जाऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.
आधीच्या अंदाजापेक्षा होणार अधिक नुकसान
संशोधकांना असे आढळून आले की, हवामान बदलामुळे जो फटका बसणार आहे, तो आधीच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक असणार आहे. कारण हवामान बदलाच्या एकूण खर्चात बिगर-आर्थिक परिणाम, दुष्काळ, समुद्राच्या पातळीतील वाढ इत्यादींमुळे होणारे खर्च विचारात घेतले गेलेले नाहीत. या सर्वांचा फटका अंतिमतः जागतिक 'जीडीपी'ला बसेल.
असा केला अभ्यास
■ हा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांनी ३३ जागतिक हवामान बदल प्रतिमानाचा उपयोग केला.
■ वर्ष १८५० ते २१०० या कालावधीत हरितग्रह वायू उत्सर्जन आणि तापमान वाढ यांच्याशी संबंधित संकेतांचे विश्लेषण करण्यात आले.
■ वार्षिक सरासरी तापमान, वार्षिक पाऊस आणि अतिवृष्टी यांचा त्यात अभ्यासही केला.
■ खर्चवाढ अन् नुकसान : अहवालानुसार, हवामान बदलामुळे कमी कालावधीमध्ये एकाच ठिकाणी खूप पाऊस पडणे आणि तापमानात वाढ होणे यामुळे होणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानहीं होत आहे.