पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यावरील पाणी संकट गडद झाले आहे. पुढील दीड महिन्यांत धरण पाणलोटक्षेत्रात पाऊस न पडल्यास ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेनंतर समन्यायी पाणी वाटप कायद्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. मुळासह अन्य धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पुढचा दीड महिना अहमदनगरकरांसाठी कसोटीचा असणार आहे.
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मुळा व भंडारदरा धरण शंभर टक्के भरते. यंदा पुरेशा पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. दक्षिण जिल्ह्यात याहीपेक्षा भयावह स्थिती आहे. या भागातील खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या असून, या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भंडारदरा धरण शंभर, तर मुळा धरण ८२ टक्केच भरले आहे. जिल्ह्यातील धरणांत सध्या पुरेसा पाणीसाठा दिसत असला तरी हे पाणी समन्यायी कायद्यानुसार जायकवाडीसाठी राखीव ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. अर्थात हा निर्णय १५ ऑक्टोबरनंतर होणार आहे. त्यावेळी धरणांत असलेल्या पाणीसाठ्यानुसार पाण्याचे नियोजन केले जाईल.
बळीराजाची चिंता वाढली
मुळा धरणातून दरवर्षी खरिपासह तीन आवर्तने देण्यात येतात. परंतु, पुढील दीड महिन्यांत पाऊस न पडल्यास समन्यायी पाणी वाटप कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे मुळा धरणातून खरिपाचे एकमेव आवर्तन मिळणार असल्याने रब्बी धोक्यात आहे.