IMD Monsoon Report: यंदा भारतात सरासरीहून अधिक मान्सून राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी जाहीर केले. जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
दुष्काळ, तापमानवाढ, गारपीट, पूर असे अनेक हवामान बदल घडत असताना देशात यंदा पाऊस कसा असणार याविषयी शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना हवामान विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा होती. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने महाराष्ट्रात आशादायी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतात साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळच्या दक्षिणेकडील टोकावर मान्सूनला सुरुवात होते. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस माघार घेतो. या वर्षी ८७ सेंटीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या एकूण १०६ टक्के पाऊस अपेक्षित असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्या भूमध्यरेखीय प्रशांत महासागरीय क्षेत्रात अल निनो मध्यम स्थितीवर सक्रीय असून जलवायु मॉडलच्या पूर्वअनुमानानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीला अल निनोची स्थिती तटस्थ होण्याचा अंदाज आहे.सरासरीहून अधिक पावसाची शक्यता
यंदा देशात वायव्य, पूर्व, इशान्य भाग वगळता उर्वरित भागांमध्ये सामान्य पावसाच्या तूलनेत अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या देशात कोणत्या भागात मान्सूनचे ढग सक्रीय असतील याविषयी स्पष्टता मिळाली नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
- संपूर्ण देशभरात नैऋत्य मोसमी पाऊस (जून ते सप्टेंबर) "सामान्यपेक्षा जास्त" असण्याची शक्यता आहे. (104% पेक्षा जास्त LPA च्या)
- हंगामी पाऊस LPA च्या 106% असण्याची शक्यता आहे (Model error +-5%) IMD