Join us

IMD Weather Update : भारतीय हवामान खात्याचा अंदाज; आता सप्टेंबरमध्येही देशभरात धो-धो बरसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 1:50 PM

ऑगस्टमध्ये सरासरी बरसला त्या तुलनेत आता सप्टेंबरमध्येही देशभरात धो-धो मान्सून बरसणार आहे. वाचा सविस्तर (IMD Weather Update)

सप्टेंबर महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारत व आजूबाजूच्या प्रदेशात अतिवृष्टी होईल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे.

वायव्य भारतातील काही भाग वगळता दक्षिणेतील अनेक प्रदेश, बिहारचा उत्तर भाग, उत्तर प्रदेशचा ईशान्येकडील प्रदेश व ईशान्य भारतातील बहुतांश प्रदेशात सप्टेंबर महिन्यात सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. मात्र, भारताच्या बहुतांश भागात या महिन्यात सामान्य पातळीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी राजधानी नवी दिल्लीत शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात १६७.९ मिमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०९ टक्के पाऊस सप्टेंबरमध्ये पडण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि मध्य प्रदेशलगतच्या भागांसह देशाच्या वायव्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये १६ टक्के अधिक पाऊस

■ भारतामध्ये ऑगस्ट महिन्यात सामान्य पातळीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस पडला आहे. वायव्य भारतात २५३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २००१ नंतर ऑगस्टमध्ये महिन्यात पडलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले.

■ या खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, देशात ऑगस्टमध्ये सरासरी २४८.१ मिमी पावसाच्या तुलनेत २८७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

केरळ, विदर्भासह अनेक भागांत कमी पाऊस

■ भारतात १ जूनपासून मान्सूनला प्रारंभ झाल्यापासून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश व ईशान्येकडील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे दिसून आले.

■ कमी दाबाच्या पट्ट्यातील स्थितीमध्ये काही बदल झाल्यामुळे असा पाऊस पडला आहे. केरळ आणि महाराष्ट्रातील विदर्भ या प्रदेशासह ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस पडला, असे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

काही भागांमध्ये पूर येण्याचा, दरडी कोसळण्याचा धोका आहे. या संकटांपासून नागरिकांनी सावध राहायला हवे, असेही मोहपात्रा यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यांत प्रत्येक आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होईल.

त्यामुळे देशभरात लक्षणीय प्रमाणात पाऊस होणार आहे. या गोष्टीचा परिणाम राजस्थान तसेच हिमालयाच्या कुशीतील राज्यांतही दिसण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊस