हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकऱ्यांना पिके माना टाकतील अशी भीती वाटत होती. परंतु, राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, जिल्हयात तर उद्या (१९) रोजी लातूर, उसमानाबाद, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, बीड, व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर पेक्षा अधिक राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ऑरेंज -यलो अलर्ट कुठे?
आज भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली लातूर जालना आणि खानदेशातील जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.