सांगली: पावसाच्या जोरदार सरींनी रविवारी सांगली, मिरज शहराला झोडपून काढले. नदी तसेच धरण पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाच तासातच कृष्णा नदीपातळी २.७ फुटांनी वाढ झाली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे.
मिरज, शिराळा, वाळवा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अन्य तालुक्यात पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. सांगली, मिरज शहरात सकाळी साडे दहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली.
चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पाणी पात्राबाहेर पडले आहे. कोकरूड रेठरे बंधारा, समतानगर, येळापूर-वाकुर्डे येथील पूल पाण्याखाली गेले आहेत.
मुसळधार पावसाने भाष्टेवस्ती येथील ओढ्याला पूर आला आहे, तसेच बांध वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील भातलावणीची कामे थांबली आहेत. आरळापैकी भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी, मिरुखेवाडी या वस्त्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली आहेत.
चांदोली धरणात रविवारी दुपारी ४ वाजता १९.०७ टीएमसी एकूण तर १२.१९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण ५५.४४ टक्के भरले आहे. शनिवारी सकाळी ७ ते रविवारी दुपारी ४ या ३३ तासात पाथरपुंज येथे ३१५, चांदोली धरण १६६, धनगरवाडा २०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी सकाळी सात वाजेपासून नऊ तासात धनगरवाडा येथे १३०, तर धरण परिसरात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अधिक वाचा: Koyna Water Level: कोयना धरणात चोवीस तासांत आलं किती टीएमसी पाणी