राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होत चालली असून, संबंध राज्यात आता केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.
विभागात आजपर्यंत तब्बल एक हजारांहून अधिक टँकरद्वारे टंचाईग्रस्तांना पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात २२ जिल्ह्यांत एकूण दोन हजारांहून अधिक टँकर सुरू झाले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे नऊ टक्क्यांनी पाणीसाठा घटला आहे.
एप्रिलच्या मध्यावर राज्यात पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ ३३.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणांमधील उपयुक्त साठा १३ हजार ६८९ दशलक्ष घनमीटर असून, एकूण साठा २० हजार ६१४ दशलक्ष घनमीटर इतका शिल्लक राहिला आहे. गेल्या याच दिवशी राज्यात ४२.१९ टक्के पाणीसाठा होता. सर्वाधिक भीषण स्थिती मराठवाडा विभागात असून, येथे केवळ १७ टक्केच पाणी शिल्लक आहे.
महत्त्वाच्या मराठवाड्यातील असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर पातळीवर पोहोचली असून, धरणात केवळ १६ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात ३३.८८ टक्के, तर सिद्धेश्वर धरणात ३९ टक्के साठा आहे.
पुणे विभागतही स्थिती गंभीर?
■ राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या पुणे विभागातही पाण्याची स्थिती गंभीर आहे. येथे एकूण क्षमतेच्या केवळ ३१.७२ टक्के साठा शिल्लक राहिला आहे.
■ विभागातील सर्व धरणांत मिळून ४ हजार ८२२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त, तर ७ हजार २९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
■ विभागातील सर्वात मोठ्या असलेल्या कोयना प्रकल्पात क्षमतेच्या ४२.२४ टक्के पाणीसाठा आहे, तर उजनी धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनीतील साठा सध्या उणे स्थितीत आहे.
■ कोकण विभागात तुलनेने राज्यात सर्वाधिक ४७ टक्के साठा असला तरी उपयुक्त साठा केवळ १ हजार ७४८ दशलक्ष घनमीटर इतकाच आहे, तर एकूण साठा १ हजार ९१३ दशलक्ष घनमीटर आहे.
■ विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात अनुक्रमे ४४.३९ व ४६.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर नाशिक विभागात ३४.८७ टक्के पाणीसाठा आहे.
नाशिक विभागात ४८१ टँकर
राज्यात सुमारे २ हजार ९३ टँकरद्वारे २२ जिल्ह्यांतील १६६५ गावे व ४ हजार वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची सर्वात जास्त झळ मराठवाडा विभागाला बसली असून, येथे १ हजार ६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात ४८१, तर पुणे विभागात ४२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागपूर विभागात दोन टैंकर तर अमरावतीत ४०, तर मुंबईत विभागात ८४ टँकर सुरू आहेत.
राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती (टक्क्यांत)
नागपूर - ४४.४९
अमरावती - ४६.६४
संभाजीनगर - १७.०५
नाशिक - ३४.८७
पुणे - ३१.७२
मुंबई - ४७.२१
एकूण - ३३.८१