नवी दिल्ली : देशभरात चांगला पाऊस पडत असूनही भारतातील १५० प्रमुख जलाशयांमधील पाण्याची सरासरी पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे, परंतु गेल्या दशकातील पातळीपेक्षा जास्त आहे. अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, देशातील विविध क्षेत्रांमध्ये जलसाठ्याच्या पातळीतील लक्षणीय फरक सकारात्मक आणि चिंताजनक असे दोन्ही कल दर्शवितात. १५० जलाशयांची एकूण साठवण क्षमता १७८.७८४ अब्ज घनमीटर (बीसीएम) आहे.
या जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ९१.४९६ बीसीएम आहे. जो एकूण क्षमतेच्या ५१ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदविलेल्या जलसाठ्याच्या पातळीच्या तुलनेत हे प्रमाण ९४ टक्के आहे. तसेच, गेल्या दशकाच्या सरासरीच्या आधारे सामान्य पाणीसाठ्याच्या १०७ टक्के आहे.
क्षमतेच्या ३९ टक्के साठा● २५ जुलैला जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या जलाशयांमध्ये उपलब्ध साठा ६९ बीसीएम इतका आहे. जो एकूण साठवण क्षमतेच्या ३९ टक्के आहे.● उत्तरेकडील प्रदेशात हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान यांचा समावेश होतो. एकूण १९.६६३ बीसीएम क्षमतेचे १० जलाशय या भागात आहेत.● सध्या त्यांच्याकडे ६.५३२ बीसीएम पाणी आहे. जे त्यांच्या क्षमतेच्या ३३ टक्के आहे. जे मागील वर्षीच्या ७६ टक्के आणि या कालावधीसाठी ५३ टक्के या सामान्य साठ्यापेक्षा खूपच कमी आहे.● पूर्वेकडील प्रदेशात आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड आणि बिहार यांचा समावेश होतो. एकूण २०.४३० बीसीएम क्षमतेचे २३ जलाशय या भागात आहेत.
महाराष्ट्रातील पाणीसाठा समाधानकारक■ पश्चिम भागात गुजरात आणि महाराष्ट्रातील ४९ जलाशयांचा समावेश होतो. या प्रकल्पांची एकूण क्षमता ३७.१३० बीसीएम आहे.■ या भागातील पाणीसाठा १९ बीसीएम आहे. हे प्रमाण एकूण क्षमतेच्या ५३ टक्के आहे. जे गेल्या वर्षीच्या ६३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु, ४८ टक्के या सामान्य साठ्यापेक्षा चांगले आहे.■ काही राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात सुधारणा झाली आहे. यामध्ये आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे.■ याउलट, राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये साठवण पातळी कमी आहे.