Join us

पावसाची ओढ, पेरण्या खोळंबल्या, पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरण्या न करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:05 AM

देशात १७ जूनपर्यंत सरासरी ७४.३ मिमी पाऊस होतो आणि यंदा आतापर्यंत ५९.४ मिमी पावसाची नोंद झाली.

पुणे : देशात मान्सूनचा या जून महिन्यातील सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची चिंता वाढविली आहे. कारण या पावसावर चळीराजा अवलंबून असतो. परंतु, आता पेरणी करायची की नाही, या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी अडकला आहे. अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत.

देशात १७ जूनपर्यंत सरासरी ७४.३ मिमी पाऊस होतो आणि यंदा आतापर्यंत ५९.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर राज्यात सरासरी ९३४ मिमी पाऊस होतो, आतापर्यंत २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, महाराष्ट्रात मात्र अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात १ जूनपासून सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे. दक्षिणेकडील काही राज्ये वगळता जवळपास सर्वच प्रदेशांमध्ये पाऊस कमी झाला असून, अर्ध्या देशात अजून मॉन्सून पोचलेला नाही. तसेच तो म्हणावा तसा बरसलेला नाही. उत्तरेकडील राज्यांमध्ये तर उष्णतेच्या लाटा जाणवत आहेत. सध्या मान्सूनची प्रगती ठप्प झालेली आहे. तो कमकुवत झाला असून, त्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सामान्यता, १ जूनच्या आसपास पाऊस दक्षिणेकडे सुरू होतो आणि ८ जुलैपर्यंत देशभर पसरतो. त्यामुळे भात, कापूस, सोयाबीन आणि ऊस यांसारख्या पिकांच्या लागवडीला आधार मिळतो, पण सध्या खूप कमी पाऊस झाल्याने पेरण्याच झालेल्या नाहीत. परिणामी बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे.

१७ जूनपर्यंतचा सरासरी पाऊस

७४.३ मिमी एवढा देशात सरासरी पाऊस होतो.

५९.४ मिमी एवढा आतापर्यंत झालेला पाऊस

९३.४ मिमी एवढा महाराष्ट्रात सरासरी पाऊस होतो.

९९ मिमी एवढा आतापर्यंत झालेला पाऊस

मॉन्सून रेंगाळल्याने चिंता कायम

उत्तरेकडील राज्यांमध्ये आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवार व रविवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कमाल तापमान सध्या ४२ ते ४७.६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, जे सामान्यपेक्षा ४-९ अंश सेल्सिअस जास्त आहे. त्यामुळे उत्तरेकडे उष्णतेचा फटका सहन करावा लागत आहे. त्यातच मॉन्सून रेंगाळलेला असल्याने त्याची चिंता लागून राहिली आहे.

उष्णतेची लाट कुठे?

देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेशचा काही भाग, हरियाणा, दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेश या भागात १८ जून रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

 

टॅग्स :पाऊसहवामानखरीपपेरणी