मान्सूनचा ऑगस्ट संपायला आता चार दिवस उरले आहेत आणि यादरम्यान दमदार पावसाची शक्यता नगण्यच आहे. त्यानंतर ७ सप्टेंबरपर्यंत विदर्भासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा किरकोळ पावसाची शक्यता आहे. चिंताजनक म्हणजे सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसल्याने सप्टेंबर महिन्यातही पावसाकडून निराशाच हाती लागण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण ऑगस्ट महिन्यात एकीकडे हिमालयाचा प्रदेश व उत्तरेकडील राज्यांत पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांत कोरड पडली आहे. ऑगस्ट महिन्यात सुरुवातीचे चार दिवस मध्यम पाऊस व १६ ते २० तारखेपर्यंत केवळ चार दिवसच पावसाने विदर्भ व मराठवाड्यात दमदार हजेरी लावली. उर्वरित दिवस कोरडेच गेले. त्यामुळे पावसाची तूट अधिकाधिक वाढली असून, मराठवाड्यात स्थिती चिंताजनक आहे.
यंदा ऑगस्टमध्ये पडलेला पावसाचा मोठा खंड ऐतिहासिक मानला जात आहे. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या चिंतेसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगितले. पावसासाठी अनुकूल ठरणाऱ्या बहुतेक वातावरणीय प्रणाली प्रतिकूल झाल्याने ऑगस्टमध्ये पाऊस कमजोर ठरला व आता सप्टेंबरचीही चिंता वाढविली आहे. सध्या सुप्तावस्थेत असलेला अल्-निनो पुढे अधिक विकसित झाला त जोरदार पावसाची शक्यता फोल ठरेल अशी भीती आहे.
शेतीच्या नुकसानाची भीती
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सून परत फिरताना मान्सूनच्या बंगालच्या उपसागरीय शाखेतून पूर्वा, उत्तरा, हस्त व चित्रा या नक्षत्रांत पाऊस होतो. मात्र, अशात आयओडी मान्सून शाखेची साथ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, ऑगस्टमध्ये निराश करणारा आयओडी सप्टेंबरमध्ये मदत करेल का, यावर साशंकता आहे. अशावेळी सप्टेंबरमध्ये पावसाने निराश केले तर खरिपाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल, अशी भीती तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.