मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले.
यंदा पावसाने समाधानकारक सुरुवात केल्यामुळे पेरण्या वेळेवर आटोपल्या. त्यानंतर एक-दोन वेळा उघडीप दिली; परंतु पुष्य नक्षत्रात पंधरवडाभर संतत पाऊस पडला. हा पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरलाच. शिवाय प्रकल्पांमध्येही पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. ऊर्ध्व पैनगंगा इसापूर धरणाच्या पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, अनसिंग, कन्हेरगाव नाका, सिरसम, खंडाळा, इसापूर व हिंगोली जिल्ह्यात तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक वाढली.
सध्या इसापूर धरणाची पाणी पातळी ४३५.५९ मीटर एवढी असून, ४८९.८५ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या धरण क्षेत्रात १ जूनपासून आतापर्यंत ५३६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरण परिसरात व पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे इसापूर धरणाचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे. पाऊस चांगला झाला तर येणाऱ्या काही दिवसांत धरण शंभर टक्के भरेल, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली.
सिद्धेश्वरमध्ये ४१.४० टक्के साठा
जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. सध्या या धरणात ४१.४० टक्के पाणीसाठा झाला असून येलदरी धरणात ३२.७५ टक्के पाणीसाठा आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे छोट्या- मोठ्या साठवण प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.