जालना जिल्ह्यासह उदगीर, पाटोदा तालुक्यांत शनिवारी जोरदार पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री परिसरातही हलक्या-मध्यम सरी कोसळल्या, पण बाकी मराठवाडा पुन्हा कोरडाच राहिला.
पहाटेपासून छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. ती बराच वेळ चालली. मात्र या पावसाची आकडेवारी केवळ ३.४ मि. मी. भरली.
फुलंब्री तालुक्यात जोरदार पाऊस
फुलंब्री तालुक्यात शनिवारी पहाटे ३ ते सकाळी ७ वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला. तसेच खुलताबाद, सिल्लोड तालुक्यातील काही भागात रिमझिम पाऊस झाला.
जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे अद्यापही वाहताना दिसत नाहीत.
जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प अद्याप कोरडे ठाक आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटे फक्त फुलंब्री तालुक्यातच मुसळधार पाऊस झाला.
जालना जिल्हा
नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी परतूर तालुक्यातील वाढोणा शिवारात घडली. बबन सदावर्ते (वय ४२, रा. सेवली, ह. मु. वाढोणा) असे मृताचे नाव आहे.
वाटूरसह परिसरात शनिवारी सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले तुडुंब वाहत होते.
या पावसामुळे वाढोणा शिवारातील नदीलाही पूर आला होता. वाढोणा गावातील बबन सदावर्ते हे पुलावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेले.
या घटनेनंतर नागरिकांसह नातेवाईकांनी नदीपात्रात शोध सुरू केला. त्यानंतर श्रीधर जवळा शिवारात बबन सदावर्ते यांचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्हा
बीड जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ४.२ मिमी पाऊस झाला असून पाटोदा तालुक्यातील पाटोदा मंडळात ७१.५ मिमी अतिवृष्टींची नोंद झाली.
पाटोदा तालुक्यात २६ मिमी पाऊस झाला. तर आतापर्यंत एकूण ५४३.६ मिमी (शंभर टक्के) पाऊस झाला.
आष्टी तालुक्यात १७.२ असून आतापर्यंत ४५७ मिमी पाऊस नोंदला आहे. बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी, शिरुर तालुक्यात तुरळक पाऊस झाला.
धारूर आणि वडवणी तालुक्यात पावसाची निरंक नोंद आहे. एक जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४३९ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७७.६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २४८.२ मिमी पाऊस झाला होता.
उदगीरसह ४ मंडळांत मुसळधार पाऊस
उदगिरात मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. शहरासह तालुक्यातील चार मंडळात शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला.
पिंपरी येथील तलावात मासे पकडण्यासाठी गेलेला एक जण वाहून गेल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाने शोधकार्य सुरू केले.
शनिवारी सकाळी ६ वा. पासून शहरासह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत पाऊस झाला.
दरम्यान, सकाळी ९:३० वा. च्या सुमारास शहरानजीकच्या उदगीर पिंपरी येथील तलावात वैजनाथ देवर्जन विश्वनाथ यात्रे (४७, रा. कंधारवेस, हेर उदगीर) हे मासे पकडण्यासाठी गेले होते.
सांडव्यावाटे आलेल्या मोठ्या नळगीर लाटेत ते वाहून गेल्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनास सांगितली, त्यावरून नगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून शोध घेण्यास सुरुवात झाली; परंतु सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदरील व्यक्ती सापडला नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली.
सोयाबीनसह इतर पिकांना लाभ
पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत होती.
तालुक्यातील चार मंडळात जोरदार पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह इतर पिकांना लाभ होणार आहे.
दुपारपर्यंतचा पाऊस
उदगीर ६४
देवर्जन ६१
हेर ५०
नागलगाव ४०
नळगीर २५
तोंडार १५
वाढवणा २४
मोघा ००
(सर्व आकडे मिमीमध्ये)
३३ मिमी पाऊस झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.